फारा वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो - आमचं लग्न नुकतंच झालं होतं, गोव्याचा आमचा हनीमून संपवून आम्ही पुण्याला परत आलो होतो. आमचं लग्न झालं त्या मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक - फडके - म्हणाले होते की लग्नाच्या प्रमाणपत्राचे काम ते करतील आणि काही दिवसांनी कार्यालयात आणून ठेवतील. ह्याच फडक्यांनी आमचं लग्न लागलं तेंव्हा मंजूळ संगीत वाजवायच्या ऐवजी लष्करी मार्चिंगचा बॅंड वाजवला होता. त्यावरून आजही लोक मला चिडवतात. तेंव्हा हे प्रमाणपत्राचं काम तरी नीट करतील ना हा माझ्या मनात प्रश्न होताच.
संध्याकाळी आम्ही फिरायला बाहेर पडलो, आणि भेळ-पाणीपुरी खाऊन कार्यालयाकडे वाट वाकडी केली. दोन मिनिटांचं काम, आणि शिवाय कार्यालयाकडे जाणारा रस्ता चालत जायला चांगला होता तेंव्हा आमची काही तक्रार नव्हती. सूर्य मावळून थोडा वेळ झाला होता, सुंदर संधिप्रकाश पडला होता. गोव्याच्या रम्य आठवणी चघळत आम्ही कार्यालयाशी हजर झालो. बाहेरुन बघितलं तर कार्यालयात काहीतरी कार्यक्रम सुरू आहे असं दिसलं. म्हटलं आज सुद्धा माझ्यासारख्याच कोणाचातरी बळी पडणार असं दिसतंय! हिने लगेच पाठीवर हळूच फटका दिला.
कार्यालयाच्या कचेरीचा रस्ता एका बाजूने होता. आम्ही तिकडून बाजूच्या दाराने कचेरीत गेलो. कचेरीच्या आतल्या दारातून हॉलमधलं दृश्य दिसत होतं. बघितलं तर आत भलत्याच उत्साहाचं वातावरण होतं - अनेक वर्षांच्या दुष्काळानंतर एखादा दिव्य विजयोत्सव असावा अशा उत्साहात सगळे वावरत होते. कोणाचं भान जागेवर नव्हतं. इतकं उत्तेजित वातावरण मी बरेच दिवसांत बघितलं नव्हतं. एरवी कचेरीत कोणी जात नाही पण आज सर्वजण आपलंच घर असल्याप्रमाणे वावरत होते. कचेरीत काही मुलं फडक्यांच्या खुर्चीत बसून खेळत होती आणि इतर काही धावपळ करत होती. फडक्यांचा काही पत्ता नव्हता. आम्ही काय करायचं ह्या विचारात दोन मिनिटं थांबलो, पण फडके काही दिसेना. मी हिला म्हटलं की हॉलमध्ये कुठे दिसताहेत का बघून येतो. मी दारातून हॉलमध्ये डोकावलं. गर्दी तशी कमीच होती, पण जे लोक होते ते भलत्याच उत्साहात होते. तरीही फडके कुठे बोळा होऊन पडलेत कळेना. इकडे तिकडे बघून मी परत कचेरीत आलो. (म्हणजे तशी तिथे बरीच हिरवळ होती, पण माझं लग्न नुकतंच झाल्यामुळे माझं तिकडे लक्ष नव्हतं, मी आपलं नुसतं फडके कुठे दिसताहेत का असा नेटाने प्रयत्न करत होतो.)
कचेरीत आलो तर ही गायब! मी हिला शोधायला कचेरीच्या दुसऱ्या आतल्या दाराने आत बघितलं तेवढ्यांत एक आजीबाई आल्या आणि मला म्हणाल्या "ये! ये! बरं झालं आलास!" मी आपलं संकोचात पडलो - बहुदा हिचे कोणीतरी नातेवाईक असावेत! नुकतंच लग्न झाल्यामुळे मी हिच्या सगळ्या नातेवाईकांबद्दल विलक्षण गोंधळलो होतो. हे अमुक मजल्यावरचे तर ते तमक्या पेठेतले - मला तर सगळे सारखेच दिसत होते! असो तर ह्या आजीबाई मला या या करत आत बोलावत होत्या तेवढ्यात अजून एक अक्का तिथे आल्या. मी काही म्हणणार एवढ्यात त्या विलक्षण उत्साहात उद्गारल्या - "ह्या बघा ह्या माई, ह्यांची तुला आहे!"
ऑं?! ह्यांची मला आहे?! म्हणजे काय?! मी म्हणालो आहो नाही! माझी आहे ऑलरेडी - ही काय अत्ता इथे होती! त्यांचं बहुदा लक्ष नसावं किंवा त्यांना ऐकू येत नसावं पण त्या लगेच अक्कांशी काहीतरी बोलायला लागल्या. मी पुन्हा ही कुठे दिसते आहे का ते मान उंच करून बघायला लागलो. आजीबाईंनी परत माझ्याकडे बघितलं - "बघायची आहे का कुठे आहे ते? ये मी दाखवते". मी "आहो नाही..." म्हणे पर्यंत त्या पुढे गेल्या होत्या.
मी अजूनच गोंधळात पडलो - काय प्रकार आहे काही कळेना. म्हणजे मी अजून एक बळी जाणार मगाशी म्हणालो तो परत माझाच?! आणि ह्या कोण तिसरीचीच मुलगी माझ्या गळ्यात मारायला आतूर होत्या? आयला इथे माझ्या लग्नाच्या प्रमाणपत्रावर भलत्याच कोणाचातरी नाव पडणार का काय?! विविध शंकांनी मन गडबडून गेलं.
त्यांनी शेवटी मागे वळून बघितलं, मी काही म्हणणार तेवढ्यात तिथे कोल्ड्रिंकचा ट्रे घेऊन एक पोऱ्या आला. आजीबाईंनी लगेच "कोल्ड्रिंक घेणार?" विचारलं. मी आपलं पुन्हा "आहो नाही..." चा पाढा सुरू केला. त्यांना वाटलं मी कोल्ड्रिंकसाठी संकोच करतो आहे, त्यांनी एक थम्स् ची बाटली माझ्या हातात टेकवली आणि म्हणाल्या ये, इथेच आहे! भेळेच्या तिखट चवीने मला जरा गोड प्यायला हवंच होतं, म्हणून आधी मी स्ट्रॉ मधून एक दोन घोट घेतले, जरा तरतरी आली, पण परिस्थितीचा काही केल्या उलगडा होईना. मी का कुठल्या मुलीला बघायला जाऊ म्हणून मी तिथेच थांबलो. आजीबाईंचं प्रेम उतू जात होतं - मला गर्दीतून वाट काढता येत नाही की काय म्हणून माझा हात धरून मला घेऊन पुढे सरसावल्या.
जरा पुढे गेल्यावर त्या म्हणाल्या "हे इकडे बघ". माझी नजर आपली खाली - आहो माझं अत्ताच लग्न झालं आहे, हे काय चालवलं आहे! असं म्हणायला मी मान वर केली, तर समोर एक भला मोठा चांदीचा तराजू होता! आजीबाई म्हणाल्या - हे बघ इथे माई बसणार आणि इथे चंदीची नाणी भरून आम्ही तुला करणार!
आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला! नाही म्हटलं तरी मगाशी मी (न) बघितलेल्या हिरवळीतलं कुठलं पान असणार हा विचार माझ्या मनात डोकावून गेला होता.
मी त्यांना म्हणालो की अहो, माझं फक्त फडक्यांकडे काम होतं, मी तुमचा आमंत्रित नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय! मी मघापासून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, पण तुमचं लक्षच नाहीये! त्यांनी थोडं गमतीने आणि थोडं दूरान्वयाने माझ्याकडे परत बघितलं. म्हणाल्या आहो आमच्या आमकी तमकीचा जावई प्रदीप मुंबईहून येणार होता, मला वाटलं तोच आलाय, इथे अंधारात नीट दिसलं नाही.
मी लगबगीने परत कचेरीकडे वळलो. आता ही कुठे गेली आहे असा विचार करत होतो. कचेरीत गेलो तर ही तिथेच! फडकेही होते आणि ज्या कागदाच्या तुकड्यासाठी आम्ही तिथे आलो होतो, तो कपटा देखील हिच्या हातात होता. मी काही म्हणायच्या आत हिने माझ्या हातातल्या कोल्ड्रिंक कडे बघितलं, फडक्यांनीही बघितलं. "अगं तुझ्यासाठीच कोल्ड्रिंक आणायला मी जरा हॉलमध्ये गेलो होतो, चालून तहान लागली असेल ना!" असा तत्परतेने मी खुलासा करायचा प्रयत्न केला. हिने चमत्कारिक नजरेने माझ्याकडे बघितलं, पण फडक्यांना शीतपेयाबद्दल काही वाटलं नाही असं दिसलं त्यामुळे एक क्लिष्ट घटका टळली. फडके म्हणाले "आज आमच्या घरातलंच कार्य आहे, तेंव्हा मी जरा आत होतो - आमचे मावस भाऊ मोठे बिल्डर. त्यांच्या आईंची आज तुला आहे". हे ऐकल्यावर आता हिला विस्मय! हिने माझ्याकडे बघितलं, मी मुद्दामून "हो! ह्यांचीपण मलाच आहे" असा आविर्भाव आणून फडक्यांशी बोलायला लागलो. दोन मिनिट कशीबशी इकडची तिकडची चौकशी केली, हिने सवयी प्रमाणे शीतपेयाचे दोन घोट घेतले आणि उरलेली बाटली माझ्याकडे वळती केली. मी (नाईलाजानेच) ती रिचवली आणि आम्ही बाहेर पडलो.
बाहेर पडताच इतका वेळ आवरलेल्या हास्याचा बांध फुटला. आम्ही अचानक एवढे खो खो का हसतोय आणि पळत पळत का बाहेर जातोय असा विचार फडक्यांनी नक्कीच केला असेल, पण आजवर परत त्यांना भेटायची वेळ आली नाहीये! मी हिला माझा किस्सा सांगितला आणि हिने मनसोक्त हसून घेतलं. अजूनही माझ्या विनोदावर ही हसली तर मला जग जिंकल्याचा आनंद मिळतो, तर तेंव्हाचं काय बोला! मी विचारलं - तू कुठे गायब झाली होतीस?! "अरे तू फडक्यांना शोधायला गेल्यावर मी तिथेच उभी होते, तेवढ्यांत तिकडून काही काकू मावशा आल्या आणि मला "ये ना! ये ना! तू कुणाची, इत्यादी इत्यादी" प्रश्न विचारत आत घेऊन गेल्या - मी शेजारच्या खोलीतच होते. मला आधी वाटलं की तुझ्या नात्यातल्या कोणी आहेत का, पण दिसायला आमच्यातल्याच वाटत होत्या, तेंव्हा काही कळेना. मग काही चौकशीनंतर त्यांना लक्षात आलं की माझं लग्न झालं आहे. मी बंद गळ्याची कमीझ घातल्यामुळे त्यांना मंगळसूत्र दिसलं नसेल. 'लग्न झालंय' कळताच झुरळासारखं त्यांनी मला झटकून दिलं आणि मी परत कचेरीत यायला लागले. तर तेवढ्यात फडके दिसले आणि आम्ही परत कचेरीत आलो.
इतका वेळ दुसऱ्या बायकोचा योग छातीठोकपणे सांगणारा मी माझ्याच सख्ख्या बायकोला त्या इरसाल बायका उजवायला निघाल्या होत्या हे ऐकल्यावर एकदम जमीनीवर आलो. मी लगेच ते लग्नाचं प्रमाणपत्र हातात घेऊन न्याहाळलं. अखेर माझीच मला मिळाली हे सही शिक्क्यासह सिद्ध झालं होतं!