कवी ग्रेस यांच्या ४ कविता. चंद्रमाधवीचे प्रदेश या काव्यसंग्रहातील.

१) मर्म


ज्याचे त्याने घ्यावे


ओंजळीत पाणी


कुणासाठी कोणी


          थांबू नये!


...असे उणे नभ


ज्यात तुझा धर्म


माझे मीही मर्म


       स्पर्शू नये


२) वाटेपाशी


रात्र थांबवुनी असेच उठावे


तुझ्यापाशी यावे क्षणासाठी!


डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेटी


आणि दिठी दिठी शब्द यावे!


तूही थेंब थेंब शब्दापाठी द्यावा


अर्थ ओला व्हावा माझ्यासाठी


आणि उजाडता पाठीवर ओझे


वाटेपाशी तुझे डोळे यावे!


३) एक


एक हात तुझा एक हात माझा


जसा शब्द खुजा शब्दापाशी


एका हृदयाला एकच क्षितिज


आकाशाचे बीज तुझ्या पोटी


एका कुशीसाठी एकाचे निजणे


बाकीची सरणे स्मशानात


४) वाटा


माझ्या मनापाशी


चैतन्याचा क्षण


निळी आठवण


बाभळीचे डोळे


डोळ्यांतला काटा


माझा मला वाटा


(कवी ग्रेस यांच्या चाहत्यांकरीता दसऱ्याची भेट)


शीला.