बेल्जियम कहाणी-४

              बेल्जियम मधे आल्यावर शिक्षण घेणे भागच होते, कारण ऱोटरी yuoth exchange चा तसा नियमच होता ना! त्यामुळे आठवडाभर मजा करायची होती मला! कारण इथे सप्टेंबर मधे शैक्षणिक वर्ष सुरू होते आणि मी आले होते ऑगस्ट च्या शेवटच्या आठवड्यात! मला वाटले कि आता मी इथल्या collage मधे! {पुढच्या वर्षी भारतात गेल्यावर मस्त मैत्रिणींपुढे ऐटीत मिरवणार कि मी एका बेल्जियम मधल्या collage मधे गेले .....} पण सारी स्वप्ने धुळीस मिळाली, कारण मला शाळेत जावे लागले. इथे १८ वर्षापर्यंत शाळाच असते आणि मी तर १० वी पास झालेली १६वर्षाची घोडी!


                शेवटी तो सुखद आठवडा संपला.{का संपला?} शाळेत जायचा दिवस येऊन ठेपला. पहिला दिवस म्हणून शाळा १० ते १२-३०! मला सकाळपासूनच शाळेचे वेध लागले होते. पोटात गोळा येत होता. वरुन जरी शांत दिसत असले, तरी आतून मात्र मी जाम घाबरले होते. नवी शाळा! फ़्रेंच माध्यम! इथल्या लोकांना फ़ारसे इंग्रजी येत नाही. मग मी कशी बोलणार? काय करणार? मला मैत्रीणी मिळणार का? असे अनेक प्रश्ण मनात गोंधळ घालू लागले.


                मी भानावर आले ती इथल्या माझ्या आईच्या हाकेनी!{ज्यांच्याकडे मी राहते ती host mom! जिला मी आईच म्हणते.}तर तिने मला हाक मारून माझ्या विचारांमधून बाहेर काढले आणि माझ्या हातात २ फ़ाईल्स ठेवल्या.मला काही कळेच ना! मला फ़ाईल्स ची काय गरज? तर ती लगेच म्हणाली- "if u need more for school, u say me!" मग मला लक्षात आले कि मला या शाळेत न्यायच्या आहेत, वह्यांच्या ऐवजी! बरोबर चौकटी-चौकटींचे कागदाचे गठ्ठेही होते.{ते कागद पाहून मला आठवण झाली माझ्या १ ली ची! जेव्हा मी अशा कागदांवर अंक लिहायचे.तसेच कागद काय हे! }असे वाटून मी या गोष्टी दप्तरात टाकल्या आणि निघाले. तुम्हाला तर माहितच असेल कि इथे शाळांना uniform  नसतो.{किती सुख ना!}


                 मला या शाळेत ५ वी मधे घातले. कारण शाळेमधिल हे शेवटून दुसरे वर्ष! त्यामुळे मला माझ्या वयाच्या {आणि जरा वयाने मोठ्याही , कारण नापास झालेली बरीच मुले असतात ना! अगदी २० वर्षापर्यंतची!}मुला-मुलींबरोबर राहता येईल. मला शास्त्रांची फ़ार आवड नाही आणि गणित तर शत्रूच!{जन्म-जन्मांतरीचा शत्रू!}त्यामुळे मी भाषा ही शाखा निवडली.


                  मला शाळेत सोडायला आई निघाली. तिने मला विचारले- " I go with u in school?" अगदी असेच म्हणाली. {तिचे इंग्रजी जरा वाईट आहे , हे तुम्हाला लक्षात आले असेलच.} मला क्षणभर काही कळलेच नाही. मग मी अगदी सहजपणे आणि आवाज जास्तीत जास्त साधा काढायचा प्रयत्न करत म्हणाले की "हो",{खरे तर मनात मी आनंदाने हुर्रे करत होते.नाचत होते.}कारण शाळेत येईपर्यंत मनात विचारांनी थैमान घातले होते. त्यात मला मी पाहिलेले इंग्रजी चित्रपट आठवू लागले.त्यातली दादागिरी करणारी मुले, नवीन आलेल्यांना एकटे पाडणारे groups दिसू लागले. माझे पाय अशा विचारांनी लटपटू लागले आणि एकदम गाडी थांबली. आम्ही शाळेपाशी पोहोचलो होतो.


                मी आईबरोबर दारातून आत शिरले. आत फ़रशी टाकलेले छोटे मैदान होते आणि त्याच्या चारही बाजूंनी शाळा! त्या मैदानात दोन मोठी झाडे ..{कुठली झाडे होती कोण जाणे! पण हे मात्र लक्षात आले कि 'मोहोब्बते' मधे अशाच पानांवर शाहरुख ऐश्वर्याला प्रेमपत्र लिहित असे....वगैरे वगैरे....} आपल्या विशाल छायेतून सूर्याच्या काहीच किरणांना आत येऊ देण्याची परवानगी देत होती. अशा या मैदानात रंगीबेरंगी कपड्यांमधिल , केसांमधिल मुले-मुली गप्पा छाटत होते. कोणी गालाला गाल भिडवून हवेत चुंबने घेत इथल्या पद्धतीने 'नमस्कार!' {bonjour}असे म्हणत होते, तर काही जण ओठावरही.... असो. तर थोडक्यात म्हणजे सारा परिसर गजबजून गेला होता.


                 तेवढ्यात एका शिक्षिकेनी शिट्टी वाजवली आणि घोळकेच्या घोळके त्यांच्याजवळ जाऊ लागले. मग त्यांनी शास्त्र, गणित, भाषा आणि कला असे गट करून त्यात सगळ्यांना विभागले. मी अर्थात भाषा या गटात! त्या गटातल्या "सारा"{उच्चारात जरी 'ह' चा उच्चार होत नसला तरी नावात शेवटी "h" आहे हं!काय विचित्र करतात स्पेलिंग्स!} या मुलीशी माझी आईने ओळख करून दिली. ती मला वर्ग बदलण्यात आणि सुरूवातीला फ़्रेंच कळेपर्यंत सूचना वगैरे साठी मदत करणार होती.


                  मी तिच्याबरोबर थांबलेली असताना अचानक एक जाडजुड, उंच मुलगा{अगदी 'भाई' सारखा दिसणारा....} माझ्या जवळ आला आणि त्याच्या ख्रर्जातल्या आवाजात काहीतरी बोलला. मला ओ की ठो ही कळ्ले नाही. {दोन महिन्यांच्या फ़्रेंच च्या शिकवणी वर किती कळणार मला!} मी तर क्षणभर घाबरूनच गेले. पण तेवढ्यात साराने त्याला काहितरी सांगितले आणि तो निघून गेला. माझा जीव भांड्यात पडला. नंतर मला कळले कि तो मला फ़क्त अमुक अमुक शिक्षिका कुठे आहेत येवढेच विचारत होता. मला तर अजुनही खरे वाटत नाही, कि मी इतकी घाबरले होते त्याला!{कारण आता तो माझा चांगला मित्र आहे......}


                     अशी सुरुवात झाल्यावर नव्या ओळखी झाल्या. काही छान मैत्रिणी आणि मोजकेच पण चांगले मित्र मिळाले. शाळेच्या या प्रवासाची सुरूवात छान झाली. हा प्रवास चांगला व्हावा हीच परमेश्वराकडे इच्छा!