माझ्या अनुदिनीवर २-३ महिन्यापूर्वी लिहीलेला हा लेख, वाचकांकरता पुन्हा इथे देत आहे.
आज बयाच दिवसांनी माझे प्रयत्न मला खुपसे समाधान आणि एक उमेद देउन गेले.
गेले काही महीने मी एक माझी स्वतःची वेब-साइट तयार करण्याचा प्रयत्न
करत होते. अर्थात मला स्वतःला वेब डिझाइंनिग चे कहीच द्यान नाही ; शिवाय
डोमेन नेम, वेब होस्टिंग आणि वेब डिझाइंनिग करता पैसा घालवणे मला अनावश्यक
बाब वाटत होती. पण निदान स्वतःच्या मालकीचे राहाते घर जरी नाही घेऊ शकलो
तरी किमान इन्टरनेट वर तरी आपली हक्काची जागा असावी असे मला तिव्रतेने
वाटायला लागले होते. एकाकडुन आलेले इ-मेल इतरांना फ़ोरवर्ड करुन त्यांचे
मेल बॉक्स भरण्यापेक्षा आपणच एखादी वेबसाइट तयार करुन त्यावर हे सगळे
टाकावे असा विचार माझ्या मनात घोळत होता.
आता जर हक्काची जागा हवी त्तर त्याकरता पैसे हे मोजायलाच लागणार; आणि
नुसते एकदाच नाही तर दरमहा घरभाडे भरण्यासारखेच काही डॉलर्स दरसाल भरा.
आपलं डोमेन नेम कोणी ढापू नये म्हणून… , आपली जागा कोणी बळकावू नये
म्हणून…, ती चांगली सजवून लोकांनी तिला भेट द्यावी म्हणून… असे एक ना दोन
अनेक खर्च पुढे उभे राहीले तेव्हा फ़ुकटचा म्हणून जो पर्याय असेल तो
निवडायचा असे ठरवले. नाहीतरी ही काही माझी बिझनेस साइट असणार नव्हती.
पण त्यातही अनेक घोळ होते. वेब साइट असण्याकरता , डोमेन नेम आणि वेब
होस्टिंग दोन्ही एकाच ठिकाणी आणि फुकट मिळायला हवे. शिवाय त्यांचीच वेब
डिझाइनिंग ची पण सोय हवी. होस्टिंगकरता मिळालेल्या जागेवर सगळ्या
प्रकारच्या फाइल्स अपलोड करण्याची पण सोय हवी होती ,आणि सगळ्यात महत्वाचे
म्हणजे ही जागा जास्तीत जास्त हवी होती. कारण माझ्याकडे ब-याच इमेज
फाइल्स, टेक्स्ट फाइल्स आणि पीडीएफ फाइल्स जमल्या होत्या. पण कोणी जागा
देत होते तर कोणी नाव नाही, कोणी नाव देत होते तर डिझाइनिंग नाही अश्या एक
ना दोन त-हा. शेवटी गुगल या सर्च इंजिनवर शोधून मी मला योग्य अश्या २-३
जणांची नावे काढून त्यावर माझे खाते उघडून एक तात्पुरती वेब साइट सुरु
केली.
माझी स्वतःची वेब साइट सुरु झाल्याच्या आनंदात असतानाच १५ दिवसांनी मला
वेब होस्टरचे इ-पत्र मिळाले की "काही कारणास्तव ही सेवा आम्ही बंद करत
आहोत". थोडक्यात आपण आपला गाशा इथून गुंडाळावा हे उत्तम. हे प्रकरण
निस्तरत नाही तोच दुसरा दणका डोमेन नेम वाल्यांनी दिला की "तुम्हाला हेच
नाव कायम हवे असल्यास अमूक इतके डॉलर्स भरा नाहीतर हे नाव आम्ही विकायला
मुखत्यार आहोत". आता आली का पंचाईत ! आलीया भोगासी असावे सादर…पण डॉलर्स
भरायचा पर्याय मला आधीपासूनच नकॊ होता.
अधिक शोधताना मला याहू आणि गुगल च्या वेब होस्टिंग , सब डोमेन आणि
डिझाईनिंगची माहीती कळली. याहू फक्त २० मेगाबाइट इतकीच जागा देऊ शकते
म्हणून तो नाद सोडून दिला. प्रथमदर्शनी पाहता गुगल ची ऑफर चांगली होती.सब
डोमेन , १०० मेगाबाइट जागा आणि वेब डिझाइनिंग. अर्थात त्यांचे डिझाइनिंग
अगदीच बाळ्बोध धाटणीचे होते ; पण गरजवंताला अक्कल नसते या उक्ती नुसार मी
माझे काम चालु केले. कालांतराने मला त्यांच्या साइटवर जाऊन , लॉग इन करुन
, फाइल्स अपलोड करुन मग त्या मला हव्या तश्या मांडणे जिकीरीचे वाटू लागले.
यावर उपाय म्हणून पुन्हा माझा शोध सुरु झाला. यावेळी मला ब्लॉग या
प्रकाराचा शोध लागला.
सुरुवातीला हा प्रकार मला पचनी पडायला जरा वेळच लागला. कारण याची
मांडणी कुठेही वेब साइट सारखी नव्हती तर एखाद्या रोजनिशीसारखे त्याचे
स्वरुप होते. म्हटला तर साचेबध्द पण तरीही काही प्रमाणात "कस्टमायझेशन"
करता येणारा, इमेज फाइल्स जशाच्या तशा दाखवणारा आणि मुख्य म्हणजे जागेची
कमतरता जाणवू न देणारा हा प्रकार नंतर मात्र माझ्या मनाला चांगलाच भावला.
ब्लॉग होस्टर शोधताना ब्लॉगर हे नाव बिनदिक्कतपणे डोळ्यासमोर येते; ते
त्यातल्या नावाच्या साधर्म्यामुळेच. ब्लॉग म्हटला की तो ब्लॉगर वरच असणार
हे काळ्या दगडावरच्या रेघेइतके सुस्पष्ट होते. मी सुध्दा ते प्रमाण मानून
माझा पहीला ब्लॉग “नोबल स्टोरीज’ हा ब्लॉगर वरच उघडला आणि पोस्टिंग सुरु
केले.
सगळे काही सुरळीत चालू होते. ब्लॉगर मध्ये मला हवा तसा इ-मेल द्वारे
पोस्टिंग करता येण्याचा पर्याय उपलब्ध होता , अर्थात फक्त टेक्स्ट फाइल्स
च. पण हे ही नसे थोडके असे म्हणून मी माझा हा उद्योग सुरु ठेवला.
हळूहळू पोस्टिंग्जचे प्रमाण वाढत गेल्यावर, मला माझ्या पोस्टिंग्ज
विषयानुरुप मांडण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याचे लक्षात आल्यावर मी माझ्याच
खात्यावर ; मला अभिप्रेत अश्या विषयांनुसार वेगवेगळे ब्लॉग तयार करुन त्या
त्या विषयांवर पोस्टिंग्ज सुरुच ठेवली. कालांतराने हा पसारा वाढून माझा
स्वतःचाच गोधंळ उडू लागला. ते सगळे ब्लॉग्ज एकत्र गुंफताना माझ्या नाकी नऊ
यायला लागले. अर्थातच यावर उपाय म्हणून ; पुन्हा माझा शोध सुरू झाला आणि
वर्डप्रेस या ब्लॉग होस्टरचा मला ठावठीकाणा कळला.
इथे सुध्दा नविन खाते सुरु केले. सुदैवाने तुमचे इतर ब्लॉग्ज तसेच्या
तसे इंपोर्ट करायची सुविधा ब्लॉग या प्रकारात असल्याने खाते उघडल्यापासून
२४ तासात वर्डप्रेस अंगवळणी पाडणे मला कठीण गेले नाही. ब्लॉगर मधल्या
सगळ्या ब्लॉग्ज ची पोस्टींग्ज वर्डप्रेस वर एकत्र पण विषयानुसार विभागली
गेली.
हे स्थित्यंतर झाल्यावर मग मात्र माझ्या लक्षात आले; की इ-मेल द्वारे
पोस्टिंग चा पर्याय यावर सहज उपलब्ध नाही. आता काय करणार ? इकडे आड ,
तिकडे विहीर…चला पुन्हा शोध सुरू.
यावर उपाय म्हणून मी डीजीट मासिकाच्या फोरम मध्ये हा प्रश्न विचारला.
मला त्यावर वर्डप्रेसचेच छोटेखानी सॉफ़्टवेअर डाउनलोड करायचा सल्ला मिळाला
, ज्याद्वारे इ-मेल सारखे पोस्टिंग करणे शक्य झाले असते. ते ही मी केले.
परंतु ते सॉफ़्टवेअर त्यांनी सांगितल्या प्रमाणे कॉन्फ़िगर करताना मात्र मला
सतत अडचणी येऊ लागल्या. अशातच वर्डप्रेसच्या सॉफ़्टवेअरचे डॉक्युमेन्टेशन
वाचताना मला अचानक ब्लॉगिंग करता खास सॉफ़्टवेअर असते याचा शोध लागला( हा
मात्र मी शोधाशोध न करता अचानकच लागला).
ब्लॉगिंग ची सॉफ्टवेअर्स शोधताना ती कोणती ? त्यात सोयी काय आहेत ? आणि
मुख्य म्हणजे फुकट कोणते ? याची शोधाशोध सुरु झली. सरतेशेवटी मला
‘क्युमाना’ या फ्रिवेअरचा शोध लागला. ज्यामुळे मी गेले महिनाभर माझ्या
इंग्लिश ब्लॉगवर अतिशय सुटसुटीतपणे टॆक्स्ट अणि इमेज फाइल्स पोस्ट करत
होते.
मातॄभाषा मराठी, पण तुमचे विचार मांडायला मातॄभाषेचा आधार न मिळणे
याहुन दुसरा करंटेपणा कोणता ? पण तरीही हे विचार मे टेक्स्ट च्या ऎवजी
इमेज फाइल्स बनवुन पोस्ट करायचा मार्ग अवलंबिला. पण त्यालाही जागेच्या
मर्यादा येऊ लागल्या कारण या फाइल्स कुठेतरी स्टोअर कराव्या लागतात.
गेल्या आठवडय़ात मात्र माझ्या या अथक परिश्रमांचे सार्थक झाल्याचे मला समाधान मिळाले. कारण ?
कारन सर्फ़िंग करताना सहजच मला एक मराठी ब्लॉग दॄष्टिस पडला. अहो काय
सांगू, माझ्याच सारखा एक ब्लॉग आणि चक्क मराठीतुन ? एवढेच नव्हे तर त्यावर
अनेक मराठी ब्लॉग्स ची यादी सुध्दा होती. त्या प्रत्येक ब्लॉग वर ची
पोस्टिंग्स पुर्णपणे मराठीतुन होती. ते पाहीले आणि मराठीतून विचर पोस्ट
करायची माझी इच्छा पुन्हा उफाळुन वर आली. मनाशी निश्चय करुन मी त्यातील
एका ब्लॉग च्या मालकाशी संपर्क साधला , पुर्ण प्रक्रीया विचारुन घेऊन मग
ताबडतोब ती अमलात ही आणली. त्याचाच परीणाम म्हणून तुम्हाला हा ब्लॉग आज
वाचायला मिळत आहे.
आता प्रश्न इतकाच आहे की, इतक्या खटाटोपाने साध्य झालेला हा ब्लॉग किती साहित्यसेवा करेल आणि वाचकांच्या ते कितपत पसंतीस उतरेल ?
समाप्त

