स्मृतिदिन

दुपारची वेळ,
सगळं आवरुन बाहेर पडण्याच्याच,
तयारीत आहे मी खरं तर.
तरीही कुठे तरी काळजाचा ठाव घेताहेत,
तुझ्या घरातुन ऐकु येणारे मंत्रस्वर.

रस्त्यावरचे दिवे लागलेत नुकतेच,
म्हणजे ही आपली नेहमीचीच वेळ.
मी आप्पाच्या चहाच्या दुकानात शिरले.
आप्पानी खरं तर नुतनीकरणात,
सगळं बदलुन घेतलय.
तरीही आपलं ते कोपर्‍यातलं
जुनं टेबल तसच ठेवलय.
तेच टेबल, त्याच खुर्च्या
मला पाहताच आप्पानं स्वतः,
फडका मारला टेबलावर
तो तेवढा आता थकलाय जरासा.
केसातही काळ्या रंगाची,
जराशीच झाक राहीलीये.
आप्पानी आणुन ठेवलेत,
दोन कटींग ग्लासातुन.
विचार करता करता,
कितीतरी वेळ निघुन गेला.
आपल्या गप्पांमधे व्हायचा तसाच,
पहिला चहा गार होऊन गेला.
सवयीप्रमाणे आप्पानी दुसरा,
गरम चहा आणुन ठेवला.
कटींग संपवुन मी उठले,
पाचच नाणं टीप म्हणुन ठेवुनच.......
आप्पानीही जपुन ठेवलं,
त्याच्या ठेवणीच्या बटव्यात ते अकरावं नाणं....

तुझ्या घरावरुन जाताना,
सवयीप्रमाणेच नजर वळली तिकडे.
तुझ्या हार घातलेल्या फोटोपुढे,
कीतीतरी उदबत्त्या दरवळत होत्या.....