कॅशियर

कॅशियर बंडू बावळे कॅशबुकात एन्ट्री करीत असतानाच 'हँड्स अप' असा आवाज आला, कानाखाली गारगार बंदुकीच्या नळीचा स्पर्श झाला. त्याच्या तोंडात बोळा कोंबून दरोडेखोरांनी त्याच्या डोळ्यांदेखत तिजोरी रिकामी केली. गोण्यांमध्ये नोटा भरल्या. कॅश काउंटर पूर्णपणे साफ केला.


हा सगळा काळ बंडू हातपाय झाडत होता, बोळ्याच्या मागून जमतील तसे आवाज काढत होता, डोळ्यांनी खुणा करत होता. सगळा माल भरून झाल्यावर वैतागलेल्या एका दरोडेखोरानं त्याच्या तोंडातला बोळा काढला आणि छद्मीपणे हसून तो म्हणाला, ''बोंबल आता किती बोंबलायचं ते. आमचं काम झालं.''


बंडू दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, ''मला बोंबलायची अजिबात इच्छा नाही, फक्त एक विनंती करायची आहे. कॅशबरोबर कॅशबुकही घेऊन जा. १२ हजार रुपयांचा हिशोब लागत नाहीये त्यात!!!''