दाण्याचे कूट

  • कच्चे शेंगदाणे
१५ मिनिटे
आवश्यकतेप्रमाणे

बाजारातून कच्चे शेंगदाणे घेऊन या. शक्य झाल्यास सर्व शेंगदाणे साधारण पणे एकाच आकाराचे/मापाचे (Sizeचे) आणावे. (कधी कधी सरमिसळ असते). अशा शेंगदाण्यांना पाण्याचा हात लावून (किंचीत ओलसर करून) १०-१५ मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.

नंतर, एक कढई धूऊन, स्वच्छ कोरडी करून घ्यावी. ती गॅसच्या चुलीवर ठेवून गॅस पेटवावा. (तेल वगैरे अजिबात टाकायचे नाही). आंच मध्यम असावी. त्यात 'ते' शेंगदाणे टाकून कलथ्याने (काही जणं यालाच 'उलथणे'ही म्हणतात) सतत परतत रहावे. शेंगदाणे भाजून ते किंचीत लालसर होतील. अजून थोडे भाजत राहील्यावर शेंगदाण्यांना फिक्कट काळसर डाग पडू लागले कि खाली उतरवून एखाद्या कोरड्या, स्वच्छ ताटात काढावेत. गरम शेंगदाणे जरा मऊसरच वाटतील. परंतु, साधारण पणे अर्ध्या तासात (भारतीय हवामानात) थंड होऊन खुटखुटीत होतील. आता यांची साले दोन्ही हातांवर चोळून काढावी. पाखडून घ्यावीत. आणि हे सालं काढलेले शेंगदाणे मिक्सर मध्ये जरा फिरवून घ्यावेत. जरा-जरा फिरवून ग्राईंडरचे झाकण काढून कूट बोटाने (बाजूंपासून) मोकळा करून घ्यावा. म्हणजे आपल्याला हवा तेवढा बारीक करून घेता येतो. 

शेंगदाणे, तीळ, खसखस, काजू, सुके खोबरे जास्त दळल्यास त्यांना तेल सुटते.