एकविसाव्या शतकातील तरुणांनो

आम्हीही तरुण होतो, एकेकाळी.
विद्रोहाची जळजळ
आमच्याही हृदयात होती, एकेकाळी.
त्यावेळी आम्हीच तर म्हणालो होतो.........

नका सांगू तुम्हीच आम्हाला,
चांगल काय अन् वाईट काय.
हेही नका सांगू,
नीती काय अन् अनीती काय.
परस्त्री सदा माता भगिनी म्हणून,
लग्नावर लग्ने आम्ही करीत नाही.
मग का हिणवता आम्हाला,
आमच्या चार मैत्रिणींवरून?
तुम्ही नका सांगू उच्चनीच भावना,
कोणी एक शेतात सापडलेली पोर -
राजकन्या होते, रणी होते, पतिव्रता होते,
कुठे पाहिली तिची कुंडली रामानं?
कशला हिणवता आम्हाला कलहवृत्ती बद्दल?
बेबंदशाही हा तर तुमचाच वारसा आहे.
सोडून देऊन शहरातलं धगधगतं जीवन,
बागदू दे आम्हाला निसर्गाच्या छातीवर मनसोक्त,
रेलचेल असूदे शुद्ध अन्नाची,
नसूदे धावपळ शाळा कॉलेजाची
अन् जग्रणे अभ्यासाची,
मग सांगा आम्हाला शरीर संपत्ती बद्दल -
तुमच्या त्या काळच्या.
नका सांगू आम्हाला धैर्य शौर्याबद्दल,
ज्या वयात लोकल मधून चालत्या बस मधून,
बिनधास्त उड्या टाकत -
शहराची उपनगरे पालथी घालतो आम्ही,
त्या वयात स्वतःची चड्डीतरी बांधत होता का तुम्ही?
नका सांगू आम्हाला सिनेमा सिगरेट बद्दल,
बावन्नखणीचा वारसा तर सोडला ना आम्ही?
इतिहासाया कवडशातच एवढं भयानक सत्य,
तर इतिहासाच्या प्रकाशात -
आणखी काय दिसेल कुणी सांगावं?
आमच्या नादानी साठी................
चार पावसाळ्यांच्या तकलादू पायांवर,
तुम्ही पकडता आमची मुंडी -
परंतु आपल्याच परंपरेला
नादान म्हणण्याइतकी नादानी -
निदान आम्ही तरी करणार नाही!



काळाच्या प्रवाहात
बरीच वर्षे वाहून गेली,
तीस-पस्तीस वर्षे...........
होय तितकीच.
जुन्या आठवणींना उजाळा देताना
एका मित्रानं प्रश्न केला,
आता बदललेल्या परिस्थितीत
आपली भूमिका कोणती?
आपण जन्म दिलेली बालकं
तरुण झालीत ..........
त्यांच्याही हृदयात
विद्रोहाची जळजळ नसेल?
काय उत्तर देशील त्यांना?
खरंच काय उत्तर असेल आपलं?
अन् अचानक शब्द पाझरले.......

तरुणांनो,
आम्ही तुमचे बाप आहोत .
म्हणूनच, तुम्हाला मिळालेला,
जन्मसिद्ध शाप आहोत.
आम्हीच दिले तुम्हाला,
भ्रष्ट स्वातंत्र्याचे वरदान?
सामाजिक अराजकतेचे दन,
ढासळत्या पर्यावरणाचे थैमान!
आम्हीही तरुण होतो एकेकाळी
पण नाही थोपवू शकलो हा प्रवाह
नाही उलटवू शकलो या लाटा,
परभूत अन् प्रवाहपतिताचं जिणं
जरी जगलो तरी,
नाही गेलो भोवऱ्याच्या तळाशी.
प्रवाहातील पथ्थरांना चुकवत
कपाळमोक्ष नाही होउ दिला.
म्हणूनच अजूनही आशा आहे,
प्रवाह वळवता येईल,
बिघडलेलं सावरता येईल,
सुकृताच्या अनुभवावर
विकृताचा आकृतीबंध सुधारता येईल.
खरंच येईल तरुणांनो
आम्हाला आशा आहे.
आमच्या शापीत जीवनाला
शिव्या घालत बसण्यापेक्षा
आमच्या सुकृताच्या अनुभवाचं सार
जाणून घ्या, विचार करा, कृती करा.
या कृतीत आमचं जीवन संपून जाणं
अनिवार्य असेल तरी कचरु नका,
पण प्रवहपतीत होऊ नका,
इतिहासाची पुनरावृत्ती करू नका,
भविष्यकाळाच्या भल्यासाठी,
भुतकाळाच्या छातीत
खंजीर खुपसणं आवष्यक असेल तर-
हे नव्या पिढीतील ब्रूटसांनो............
हा वृद्ध सीझर निःशस्त्र होऊन
तुमचा वार झेलण्यास सिद्ध आहे,
अन् गर्जना करतोय....................
देन सीझर मस्ट डाय-
देन सीझर मस्ट डाय-
-सुनिल देशपांडे.