बास्केट चाट

  • ५ -६ मध्यम आकाराचे बटाटे
  • २ वाट्या काबुली चणे
  • छोले किंवा आवडीचा मसाला
  • २ - ३ मिरच्या
  • १ चण्याएवढे आले
  • १ पाकळी लसूण
  • २ मध्यम कांदे
  • १ मध्यम टोमॅटो
  • शेव (मिळाल्यास)
१५ मिनिटे
दोन जणांना

चाट:
काबुली चणे रात्री कोमट पाण्यात चिमूटभर सोडा घालून (जास्त सोड्याने चव बिघडते.) भिजत ठेवावेत. सकाळी चणे आणि १ बटाटा कुकरमधे शिजवावा. (छोले नीट न भिजल्यास शिजायला वेळ लागतो.म्हणून छोले संध्याकाळी भिजवले तरी चालेल.)
तेल, जिरे यांची फोडणी करुन त्यात कांदे व टॉमेटो मोठे चिरुन परतावे. हे मिश्रण थंड झाल्यावर थोडे चणे, १ उकडलेला बटाटा,मिरच्या,आले,लसूण यासह मिक्सरमधे फिरवावे. आता हे मिश्रण परतून त्यात उरलेले चणे व मसाला मीठ, हवे असल्यास दही टाकून मंद आचेवर परतावे. घट्टसरच बनवावे.
बास्केटस:
कच्चे बटाटे सोलून किसून कागदावर वा कापडावर दाबून कोरडे करावे. हा पाण्याचा अंश जवळजवळ नसलेला किस धातूच्या गाळण्याच्या बाजूना आतून सर्व ठिकाणी समान थर देउन दाबावा. आता तेल तापवून हात न भाजता गाळणे तेलात धरुन हि बास्केट सोनेरी रंगावर तळावी. अशा ७-८ बास्केट (पहिल्या १-२ बिघडतील, पण नंतरच्या नक्कीच जमतील.) तळून घेउन टिश्यु कागदावर तेल निथळण्यास ठेवाव्या. मग अलगद गाळण्यातून बास्केट काढावी. (२ गाळणी असल्यास पॅरलल प्रोसेसिंग करता येइल.)

अगदी वाढण्याच्या वेळी या बास्केटस मधे आधी केलेले छोले, कच्चा कांदा आवडीप्रमाणे, शेव, चिंचेची चटणी आवडीप्रमाणे घालून वाढावे आणि गरम गरम खावे. बास्केटस करण्याची कृती किचकट वाटली तरी त्या कुरकुरीत बास्केटस मधे चाट खाताना खूप आनंद होतो.