ऍडवायज़र <-> बडवायज़र <-> अपार्टमेंट <-> डिपार्टमेंट (३) - अ

लेखन वाचण्यापूर्वी एक (अति)आगाऊ सूचना - प्रस्तुत लेखन हे लेखकाच्या परदेशी वास्तव्यातील बहुरंगी बहुढंगी (हे म्हणजे लिहिताना आपलं ज़रा छान छान वाटायला!) अनुभवांचे चित्रण असल्याने, तसेच त्यातील सुखदु:ख केवळ लेखकालाच ठाऊक असल्याने, मनोगतावरील संस्कृतीरक्षक, संस्कृतीभक्षक, व्याकरणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ आणि इतर अनेक विषयांतील तज्ज्ञांनी या लेखनाच्या विश्लेषणाआधी याकडे केवळ एक लेख म्हणून न पाहता, सलग बत्तीस तासांचं अपरिहार्य जागरण आणि त्यानंतरची तितकीच अपरिहार्य झालेली सलग सतरा तासांची झोप यांचा उद्वेगजन्य परिपाक म्हणून पाहिल्यास लेखनाचा निखळ आनंद (निदान लेखकाला तरी!) लुटता येईल.

सध्या अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये पैशाची अतिशय चणचण भासते आहे, असे सगळीकडे ऐकायला मिळते. त्याला अनुसरूनच, पदव्युत्तर शिक्षणासाठी इकडे येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना विद्यापिठाकडूनच आर्थिक मदत मिळण्याचे सुगीचे दिवस आता सरलेत. कोणत्याही ज्ञानशाखेत केवळ 'मास्टर्स' करायचे असेल, तर विद्यापिठाकडे पैसा नाही; मात्र 'डॉक्टरेट' करायची असेल, तर शुल्कमाफ़ी आणि ज़ोडीला अध्यापन अगर संशोधनात प्राध्यापकांना सहाय्य करण्याच्या मोबदल्यात मासिक भत्ता द्यायला ज़वळपास सगळीच विद्यापिठे एका पायावर तयार आहेत. आमचे विद्यापीठही याला अपवाद नाही. मात्र पैसा नसल्याची ओरड करणाऱ्या विद्यापिठांमधील एकेका प्राध्यापकाची विद्यापिठीय जन्मकुंडली (म्हणजे त्यांनी आतापर्यंत विद्यापिठात राहून काय काय संशोधन केले आहे, कुठले कुठले विषय शिकवले आहेत इ.) पाहिली, की त्यात सगळेच शुभग्रह धनलाभाच्या घरात ठाण मांडून बसलेले दिसतात. आणि गंमत म्हणजे या घरात कधीच शनी वक्री किंवा राहूकाल वगैरे प्रकार नसतो!

विद्यापिठात पाय ठेवताक्षणी 'मध्यमवर्गीय' भारतीय विद्यार्थ्याने करावयाची गोष्ट म्हणजे प्राध्यापकांच्या भेटीगाठी घेणे आणि कुणाकडे काही छोटेमोठे संशोधन संबंधित काम असेल, तर ते बिनपगारी करण्याची तयारी दर्शविणे. त्यामागे, पुढेमागे या महाशयांना आपले काम आवडेल, आणि आपल्याला पुढच्या सत्रापासून शुल्कमाफ़ी तसेच मासिक भत्त्याची दिवाळी भेट मिळेल, हे प्राध्यापक महोदय मग आपल्याला प्रबंधलेखनात नि संबंधित संशोधनात मार्गदर्शन करण्यासाठी आपले 'ऍडवायज़र' होतील, अशी भाबडी अपेक्षा! आल्याआल्याच ज्या महाभागाला आपण ओळखतही नाही, त्याच्यावर 'इंप्रेशन' मारायचे म्हणजे काय काय करायला लागते, यासंबंधीचे आवश्यक (?!) मार्गदर्शन इतर सिनिअर मंडळींकडून झालेले असतेच. प्राध्यापकाला आधी पत्र लिहून, त्यासोबत आपला 'रेझ्युमे' ज़ोडून भेटीची वेळ ठरवणे, इथपर्यंत बहुतेक सगळेच विद्यार्थी यशस्वी होतात, आणि भेटीच्या दिवशी ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास आधीच प्राध्यापकाच्या कार्यालयाबाहेर येऊन बसतात. २००५ सालच्या ऑगस्ट महिन्यात मी सुद्धा असाच एका विद्वानाच्या कार्यालयाबाहेर ताटकळत होतो.

"कम इन छ.. छचछ..क..र..पॅ.. नि.." माझ्याच नावातली शेवटची तीन अक्षरे उच्चारल्याची ज़ाणीव जेव्हा मला झाली, तेव्हा मी आत ज़ायला उठेपर्यंत प्राध्यापकसाहेब स्वतः मला रीतसर आत घेऊन ज़ाण्यासाठी आले होते. त्यांच्याशी हस्तांदोलन करून आत गेलो नि त्यांच्या समोर बसलो. माझी प्राथमिक ओळख वगैरे करून दिल्यानंतर मग मुद्द्याचे बोलणे चालू झाले.

"सो विच ऑफ़ माय प्रॉजेक्टस फ़सिनेट यू द मोस्ट?" या त्यांच्या प्रश्नाला मी पाठ केलेले उत्तर दिले. आदल्या रात्री साहेबांची प्रॉजेक्टस नज़रेखालून घालून त्यांवरची टिपणे तयार करण्यात, त्यांच्याशी संबंधित तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात मी जी तन्मयता आणि वेळ खर्च केले होते, तेच मी इंजिनिअरींगला असताना तेव्हाच्या अभ्यासात केले असते, तर फ़र्स्ट क्लास ऐवजी डिस्टिंक्शन नक्कीच मिळवले असते.

"बट यू सी धिस प्रॉजेक्ट हॅज़न्ट गॉट एनी फ़ंडस यट! आय हॅव फ़ाइल्ड ए नाइस प्रपोज़ल फ़ॉर इट ऍंन्ड आय ऍम होपिंग टु गेट टु मिलिअन डॉलर्स फ़ॉर इट. बिसाइडस दॅट रेस्ट ऑफ़ माय प्रोजेक्टस आर बिंग हॅन्डल्ड बाय माय पी एच डी स्टुडन्ट्स ऑलरेडी. सो डु यू वॉंट टु वेट फ़ॉर द अप्रूव्हल फ़ॉर धिस वन?"

माझ्या वडिलांच्या चाळीसएक वर्षांच्या सरकारी नोकरीत त्यांनी घेतलेल्या पगारांची नि भत्त्यांची बेरीज़सुद्धा दोन मिलिअन डॉलर्स झाली नसती. मी न म्हणण्याचा प्रश्नच नव्हता; पण महाशयांच्या आणखीही अटी होत्याच.

"यू विल ऑल्सो हॅव टु टेक माय कोर्स इन द नेक्स्ट सेमेस्टर ऍंड ऑब्टेन ऍन ए ग्रेड इन इट. बाय द वे शी इज़ माय वाइफ़ एलिया..." संगणकाच्या पडद्यावरील आपल्या नि आपल्या सौभाग्यवतींच्या, ग्रीसच्या कुठल्याशा समुद्रकिनाऱ्यावर घालवलेल्या सुटीतील, 'स्क्रीनसेव्हर' म्हणून अवतरलेल्या एका फ़ोटोकडे निर्देश करून ते म्हणाले.

"ही आमची कवळ्याची शांतादुर्गा. हे माझे आईबाबा. आणि ही माझी गर्ल..फ़्रें....." 'सांगू का मी पण सांगू' या आवेशात पण मनातल्या मनातच मीही.

म्हणजे आता पुढच्या सत्रापर्यंत थांबायचे? तोवर एखादी कामचलाऊ नोकरी करणे आलेच. नोकरी, अभ्यास सांभाळून यांचे काम करायचे म्हणजे मी लवकरच निजधामाच्या वाटेवर निघणार, हे मला डोळ्यांसमोर दिसू लागले.

"वुड यू लाइक टु हॅव सम फ़्राइज़? लेट अस गो फ़ॉर लंच इफ़ यू आर नॉट डुइंग एनिथिंग ग्रेट" महाशय खाण्यापिण्याच्या बाबतीत अगदी उदार दिसतायत. पण आज़च्या संकष्टीच्या दिवशी यांच्याकडे साबुदाणा खिचडीची मागणी कशी करायची? बरे पहिल्याच भेटीत कॉफ़ी किंवा सरबत तरी कसे मागायचे? माझा भिडस्तपणा असा नको तिथे नडतो! शेवटी कशीबशी उरलीसुरली भेट संपवून बाहेर पडलो. इतर दोन प्राध्यापकांकडूनही ज़वळपास सारखीच उत्तरे मिळाली. कोणाकडेच बिनपगारी काम न करता मी गपगुमान माझे स्वतःचे काम करायला सुरुवात केली.

माझ्याचसारखे अनुभव इतर काही मित्रांनाही आले होतेच. अशाच एका संध्याकाळी घराबाहेरच्या कट्ट्यावर अड्डा ज़मला असताना सगळ्यांनी आपापले अनुभव वाटून घेतले.

"अरे वो बंदा बोला उसको सी प्लस प्लस मे कोड करनेवालाही कोई चाहिये"

"क्या बात कर रहा है! मुझे तो बोला प्रॉजेक्ट मे सी प्लस प्लस की कोई ज़रूरत है ही नही वैसे. अजीब आदमी है यार!"

"मैने तो सोचा था उसके लिये वो गणेशजी की छोटीवाली मूर्ती और एक बॉक्स आग्रे का पेठा लेके जाउंगा. पर भूल गया..."

"अबे तू प्रॉफ़ के पास जानेवाला था की मंदिर में? पागल हो गया है क्या तू?"

अशी कित्येक सुखदु:खं मी पहिल्या सत्राच्या सुरुवातीच्या दोनेक महिन्यात बऱ्याचदा ऐकली होती.

अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या सत्रात मात्र एका भारतीय प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र संशोधन करण्याची संधी मिळाली आणि तिथूनच ऍडवायज़र या व्यक्तिरेखेशी ज़रा ज़वळून संबंध आला.