प्रेम

प्रेम म्हणजे प्रेम, केवळ प्रेमच असते,
दुसरे तिसरे काही काही काहीही नसते ॥


ते एक हळुवार भावनांचे नाजूक नाते असते,
भावभऱ्या मनाचे, सुरिले गीत असते ॥


तिथे तुझे माझे,माझे तुझे काहीही नसते,
जे काही असते ते सारेच परस्परांचे असते ॥


एकदा आपले मानले, की मग सारेच मानायचे असते,
नि पावलापावलावर परस्परांना सदैव सावरायचे असते ॥


एकमेकांत मिसळून, विरघळायचे असते,
नि स्वत:चे स्वत्व दुसऱ्यांत पाहायचे असते ॥


सारेच्या सारे कधीही, कुठेच पटत नसते,
नि म्हणूनच बरेचसे तडजोडीने मिळवायचे असते ॥


प्रेम मिळावे लागते, मिळाले तर कळावे लागते,
एकदा कळले की मग, सदैव वाढवायचे असते ॥


प्रेम नशिबाची गोष्ट असते, ते नशिबवंतांनाच लाभते,
पण आपणच नशीबवान आहोत हे मात्र कळावे लागते ॥


- संगीता कुलकर्णी