७४. शालू हिरवा, पाचूनी मरवा, वेणी तिपेडी घाला
साजणी बाई येणार साजण माझा
गोर्या भाळी, चढवा जाळी, नवरत्नांची माला
साजणी बाई येणार साजण माझा ॥धृ.॥
चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ गं
लुटूपुटीच्या संसाराची संपत आली वेळ गं
रेशिम धागे ओढीती मागे, व्याकुळ जीव हा झाला ॥१॥
सूर गुंफिते सनई येथे, झडे चौघडा दारी
वाजतगाजत मिरवत येईल घोडयावरुनी स्वारी
ही वरमाला घालीन त्याला, मुहूर्त जवळी आला ॥२॥
मंगलवेळी मंगलकाळी, डोळां का गं पाणी
साजण माझा हा पतीराजा, मी तर त्याची राणी
अंगावरल्या शेलारीला बांधून त्याचा शेला ॥३॥
गीतकार : शांता शेळके
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक : उषा मंगेशकर