७५. अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त

७५. अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात ॥धृ.॥


धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी ॥१॥


मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा ॥२॥


जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव ॥३॥


जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान ॥४॥


काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा ॥५॥


गीतकार : कुसुमाग्रज
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक : लता मंगेशकर