बेल्जियम कहाणी - ६

     खरे तर हा भाग फ़्रान्स मधिल आहे आणि यात पहिल्या गोष्टींशी फ़ार संबंध नाही, पण तरी  संदर्भ असावा म्हणून याच सदरात लिहीत आहे. २५ नोव्हेंबर ला मी बेल्जियम मधे तीन महिने पूर्ण केले. त्याच दिवसाबद्दल....   


                   २५ नोव्हेंबर !! एक अविस्मरणीय दिवस !! कधी कधी आपण येणाऱ्या प्रसंगांना किती वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो आणि गोष्टी किती वेगळ्या घडतात त्याचे उत्तम उदाहरण मला या दिवसातून मिळाले.


                   आमच्या इथल्या रोटरी क्लबला फ़्रान्स मधल्या कारकासन मधील क्लबने आमंत्रण दिल्याने मी त्यांच्याबरोबर निघाले. आमचे काही सभासद आणि माझी मैत्रीण हायडी ! {ही माझ्यासारखीच exchange मधे आलेली australian  मुलगी !!}


                   आम्ही तिथे एका मस्त हॉटेल मधे राहणार हा आमचा समज.. पण गंमत म्हणजे आम्ही एका कुटुंबात राहिलो. कारकासन हे गाव तसे अगदीच लहान असल्याने आम्ही {एक मी indian आणि हायडी australian }तिथे पोहोचल्याची बातमी सगळीकडे पोहोचली होती. त्यामुळे आमच्या या नवीन कुटुंबाने आम्ही त्यांच्या गावातल्या शाळेत जाऊन फ़्रेंच मधे आपापल्या देशांची माहीती सांगायचा जंगी कार्यक्रम आखला आणि अर्थातच २४ तारखेला रात्री आलेल्या दमलेल्या आम्हा दोघींना तो पसंत नव्हता. पण विरोध करणे शक्य नव्हते. कारण एक तर आम्ही त्यांचे पाहुणे आणि ते या गोष्टीसाठी फ़ारच उत्सुक होते. मग आम्ही आमच्याकडे काहीच नाहिए दाखवायला अशा छोट्या छोट्या सबबी दाखवायचा प्रयत्न आम्ही केला पण त्या सर्वांना इंटरनेट हा पर्याय असल्याने नाईलाजाने आम्ही तयार झालो.


                 २४ तारखेला झोपताना फ़क्त हेच विचार येत होते. काय कटकट आहे? राहून राहून हाच विचार येत होता की शाळा नसूनही आम्ही सकाळी लवकर उठणाऱ आणि मी माझ्या ३ महिन्यांच्या मोडक्या- तोडक्या भाषेत त्यांना भारताची माहिती देणार.


                   २५ तारिख उजाडली. आम्ही दोघी मोठ्या मुश्किलीने आवरून  तयार झालो. शाळेकडे चालत जात असताना मी मनात वाक्यांची जुळवा-जुळव करु लागले. पण व्याकरणात घुसल्यावर माझा प्रचंड गोंधळ उडाला. तोपर्यंत आम्ही शाळेत पोहोचलो होतो.


                     ही शाळा म्हणजे अगादी छोटासा आवार होता. वर्ग तर अगदी मोजून ५-६ असतील. ते ही लहान म्हणजे ८-१० वर्षाच्या मुलांसाठीचे !! शाळेचे बांधकामही तसे जुने होते. पण या शाळेचे वैभव म्हणजे त्याची नेमकी जागा.......आजूबाजूला उंच डोंगर {कधी नव्हे ते... इथे सगळे सपाटच नाहीतर आणि त्यात मला तर सतत घाट बघण्याची सवय.. असो.}, शिवाय त्यावर हिरव्या रंगांच्या झाडांमधे पिवळ्या आणि लाल रंगांची उधळण !! शरद ऋतुमुळे पाने गळत होती, पण इथे फ़रक हाच की ती गळण्याआधी बघणाऱ्याला हुरळून टाकत होती. त्याच्या सौंदऱ्यात मी तर हरखूनच गेले. त्या रंगांनी जशी काही माझी नजर रोखली गेली.


                    तेवढ्यात हायडी ने हाक मारली आणि मी भानावर येऊन तिच्याबरोबर त्या छोट्या छोट्या मुलांच्या वर्गात निघाले. ती लहान लहान मुले आमची वाट बघत होती. आल्या-आल्या त्यांनी धावपळ करून खुर्च्या आणल्या. आम्ही त्यावर बसताच आमच्यवर प्रश्णांची सरबत्ती सुरू झाली. प्रथम आमचे नाव- गाव या अगदी प्राथमिक गोष्टींबद्दल बोलल्यावर खऱ्या प्रश्णांना सुरूवात झाली. त्यांच्या चौकस प्रश्णांना फ़्रेंच मधून  उत्तरे द्यायला नाकी नऊ आले. त्यात आमचे बेल्जियन उच्चार म्हणजे तर सगळी गफ़लतच.......


                      पण अशात दोन तास कसे गेले याचा आम्हाला थांगपत्ताही नव्हता. काल आम्ही याच ठिकाणी यायला काय कटकट करत होतो. असो, ही चूक अजून न करता आम्ही दोन तासांऐवजी चार तास थांबायचे निर्णय घेतला. मग मी सर्वांना माझी आठवण म्हणून प्रत्येकाला त्याचे त्याचे नाव मराठी मधून लिहून दिले. काय आनंद झाला सर्वांना !! त्यात कित्येकांचे डोळे आश्चर्याने भरून गेले होते आणि त्यांच्या शिक्षिकांना जेव्हा कळले कि मला एकूण तीन भाषा व्यवस्थित बोलता येतात, तेव्हा तर माझे फ़ारच कौतुक करू लागल्या. मला तर फ़ार हसू फ़ुटत होते. {भारतात तर प्रत्येकाला तीन भाषा शाळेत तर शिकाव्या लगतातच आणि त्यात काही लोकांना जास्त भाषा  येत असतात हा भाग निराळाच....}


                     यानंतर जी गोष्ट घडली ती मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. त्या मुलांनी आम्हाला स्वतःच्या हातांनी चित्रे काढून दिली. त्यात ना मोठ्या चित्रकारांसारखी अर्थपूर्ण आकार होते , ना रंगसंगती.....पण त्यात होत्या त्यांच्या भावना आणि प्रेम जे आम्ही फ़क्त तीन तासांच्या सहवासात मिळवले होते. ती चित्रे घेताना आमचे डोळे भरून येत होते. त्यांच्या चित्रांना नुसते छान म्हणण्यापेक्षा जास्त काही म्हणायचे होते , पण जमतच नव्हते . कारण एक तर आम्ही दोघीही भावनाविवश झालो होतो आणि फ़्रेंच फ़ार येत नाही त्यामुळे शब्द सुचायची मारामार.... 


                    नंतर या मुलांबरोबर आम्ही बाहेर पडलो. त्यांचा शेवटचा तास मैदानी खेळांचा होता. गावात जे मैदान होते , तिथे आम्ही चालत निघालो.  सगळ्या मुलांना आमचेच हात धरून चालायचे होते. पण अर्थात ते शक्य नव्हते. त्यांचे हिरमुसलेले चेहेरे बघवत नसल्यने आम्ही आळी-पाळीने हात बदलत होतो. फ़क्त आमचा हात धरून चालण्यात त्यांना इतका आनंद होत होता की काही सांगायला नको. आम्हाला दोघींनाही त्याच्या निरागसपणाबद्दल कौतुक वाटत होते.


                      अशा प्रकारे हातांची कसरत करत आम्ही तिथे पोहोचलो. मला अचानक एक कल्पना सुचली कि यांना भारतीय खेळ शिकवला तर.... मी तशी परवानगी शिक्षिकेकडून घेतली आणि मुलांना "लंगडी" शिकवायचा प्रयत्न करु लागले. पहिल्यांदा तर त्यांना हे कळतच नव्हते कि एकाला आउट केल्यावर लंगडी घालणाऱ्याने पाय खाली टेकवायचा नाही. शेवटी मी आणि हायडी ने तसे खेळून दाखवल्यावर त्यांना समजले. मग मात्र धमाल !!!! जवळ जवळ तास भर खेळलो आम्ही...मी ही एकदम तीन वर्षांनी खेळले लंगडी !!! त्यामुळे मस्त दमणूक झाली.


                       यानंतर मात्र आम्हाला घरी जाणे भाग होते. काय हे?? शाळा संपली होती. घरी जाताच जेवून आम्ही गादीवर पहुडलो. लगेचच आम्हाला झोप लागली आणि त्यावेळी स्वप्नातही मी त्या लहान मुलांबरोबर लंगडीत रमले होते....


क्रमशः