शनी
बैसला एकटा अंधारा
कोरडा आणि गर्द काळा
भोवती विचारांचा घेरा
येता शनी चा हा फेरा
मना वाटे कसा हा दरारा
येता शनीच्या कड्याला धार,
पडे राजकीय अंधार
प्रखर तेजस्वी रवी,
खाई तो ही शनी पुढे हार
शनी चा आगळा आकार
मिटता सारे दरवाजे
साधे, मन मनाशी संवाद
शनी अजस्र अंधारा काळोख
आता डोकावू मनात
नको बाहेर देखा-देख
शनी ची ही शिस्त भारी
किती असो राजस ते मन,
मुकाट करू लागते चाकरी
नुरे सभोवती कोणी मित्रा सारखा
सापडला जो फेऱ्यात
तो प्रेमाच्या एका शब्दालाही पारखा
मना आवर आवर नको कुर-कुर
गुमान सोसावा सारा श्रमांचा भार
पावले चालती वाट अंधाराची गार
वेळ जाता जाईना, काळ सरता सरेना
विझलेली स्वप्ने सारी,
आता मनही आक्रंदेना
म्हणे स्तंभी झाला शनी
काळोखाची साडेसाती
आता हटविता हटेना
चालता चालता, मन अडखळले
अंधाऱ्या या वाटे मध्ये,
सत्य सामोरे दिसले
जीवनाच्या चालण्यात
ज्यांना समजतो आपुले
ते काय आता येतील
ते तर स्वतः लाही न पुरले
खरं तुझं कोणी नाही
हेच सत्य आता समजले
मन मनाला समजावे
न येता हा शनी चा फेरा
सत्य मला कसे उमगावे?
-निनाद