अनंत-२

अंत नसलेला तो अनंत! अंत म्हणजे काय? दुःखाचा अंत कशास म्हणावे? अधिक विचार करता असे जाणवते की अंत म्हणजे वस्तुतः बदल होय. दुःखदायक परिस्थिती बदलून जी दुःखविरहित परिस्थिती निर्माण होते तिलाच आपण दुःखाचा अंत मानतो. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव आहे. जग या शब्दाची व्याख्याच “जनयति गमयति” आहे. जनयति म्हणजे निर्माण होणारे आणि गमयति म्हणजे नाश पावणारे. थोडक्यात आरंभ तेथे अंत हा जगाचा सिद्धांत आहे.


आता अंताचा अंत यावर विचार करू या. जर अंत म्हणजे बदल तर अंताचा अंत म्हणजे सतत बदलाची प्रक्रिया थांबणे. थोडक्यात जनयति म्हणजे आरंभ थांबला तर गमयति म्हणजे अंत थांबेल. परंतू. या वाक्यात थांबणे हा शब्दच मुळी विरोधाभास दाखवतो. कारण, थांबणे याचाच अर्थ कुठेतरी, कधीतरी, कशाची सुरुवात झाली होती. याचाच अर्थ अंताचा अंत म्हणजे मुळात सुरुवात झालीच नाही. ह्याचाच दुसरा अर्थ म्हणजे आरंभ व्हायच्या आधी ज्याचा आरंभ झाल्यासारखा वाटतो असे काहीतरी. येथे “आरंभ झाल्यासारखा” हा शब्दप्रयोग करीत आहे. यात “सारखा” हा शब्द विशेष महत्त्वाचा आहे. कारण आरंभाचा आरंभ झाला म्हणजे त्या आरंभास अंत हा असलाच पाहिजे. ओघानेच तो अंताचा अंत होऊच शकणार नाही.


दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे “आरंभ व्हायच्या आधी” या वाक्यप्रयोगात “आधी” हा कालवाचक शब्द आहे. येथे सहज प्रश्न उपस्थित होतो की काळास अंत आहे काय? या प्रश्नाच्या उत्तरासाठी काळाचा आरंभ शोधायला हवा. मुळात काळाचे अस्तित्व हे सृष्टीच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. जेव्हा हे विश्व निर्माण झाले त्यानंतर जो क्षण आला त्यापासून काळाचा जन्म झाला. त्या क्षणास निमेष, सेकंद, सेकंदाचा हजारावा भाग इत्यादी कोणतेही संबोधन वापरले तरी हेच तथ्य कायम होते.


सारांश अंताचा अंत, आरंभाच्या आधी आरंभ झाल्यासारखा आणि अनंत हे तीनही एकच तत्त्व होय. हेच तत्त्व सृष्टीच्या आधी अस्तित्वात होते. हेच तत्त्व सृष्टीच्या नंतरही अवशिष्ट राहील. हा नियम आपण गणितानेही तपासून पाहू शकतो काय? उत्तर देणे अवघड आहे.