भटक्याची प्रार्थना

वर्षानुवर्षं माझ्या तांड्याबरोबर या वाटेवरून चालता-चालता, एक कळलंय मला -


रात्र संपायची प्रार्थना करू नये कुठल्याच तांड्याने.


कारण, कुणाच्याही प्रार्थनेने संपत नसते रात्र,


केवळ सरते, सरकते - एका वाटेवरून दुसऱ्या वाटेवर


                           एका तांड्यावरून दुसऱ्या तांड्यावर.


प्रार्थना करावी ती ही की -


माझ्या तांड्याकडे असावेत पुरेसे दिवे, रात्रींतून मार्ग काढण्यासाठी.


आणी, भेटला जर कधी वाटेत दुसरा तांडा, दिव्यांवाचून चाचपडणारा, तर...


देता यावेत आपल्याकडले काही दिवे - निर्लेप हातांनी.