सवाई गंधर्व महोत्सवामुळे हुकलेल्या मैफिली

सात डिसेंबर ते दहा डिसेंबरपर्यंत पुण्याच्या रमणबाग शाळेच्या प्रांगणात शास्त्रीय संगीताचा मळा फुलला होता. वेगवेगळ्या घराण्यांच्या विविध शैलीतील गायन वादनाला बहर आला होता. त्याचा आनंद घेण्यासाठी हजारो रसिक तेथे गर्दी करीत होते. पण गंमत म्हणजे नेमक्या याच कालावधीत त्याच पुणे शहरात संगीतविषयक कांही वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम इतर ठिकाणी सुद्धा चालले होते. तसे पाहतां मुंबई व पुण्यामधील वेगवेगळ्या सभागृहात रोजच कांही ना कांही कार्यक्रम सुरूच असतात. रोज उठून आपण कुठे ते पाहतो? पण त्यातील निदान तीन कार्यक्रमांना हजर राहण्याचा प्रयत्न करावा असे एरवी वाटावे असे ते होते.


पहिला कार्यक्रम तर अगदी आमच्या घरासमोरील पटांगणात होणार होता. तिथे उभा रहात असलेला शामियाना व रंगमंच, प्रेक्षकांसाठी मांडण्यात येणाऱ्या खुर्च्या वगैरे सारे आम्हाला खिडकीतून दिसत होते. इतकेच नव्हे तर ध्वनिक्षेपणाची चांचणी घेण्यासाठी त्यावर लावलेली गाणी अगदी स्पष्ट ऐकू येत होती. गजलसम्राट जगजीतसिंह यांच्या गजलगायनाचा कार्यक्रम त्या संध्याकाळी तिथे झाला. यापूर्वी मुंबईच्या कुठल्याशा दूरच्या उपनगरातील सभागृहात मुद्दाम जाऊन आम्ही हा कार्यक्रम पाहिला होता. आता अगदी घरासमोर तो पहाण्याची संधी आली होती. आयत्या वेळेस तिकीट मिळालेच नाही तरी घरबसल्या तो मुलायम आवाज ऐकू येणार होता. पण ...


शनिवारवाड्यासमोरील मोकळ्या जागेत झालेल्या दुसऱ्या कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीत व पाश्चात्य संगीत यांचा मधुर मिलाप जुळवून आणला होता. दूरदर्शनवरील अनेक हिंदी व निदान श्रीनिवास खळे य़ांच्या एका मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात झळकलेले, विविध प्रकारच्या चित्रगीतांबरोबरच 'ब्रेथलेस' गाऊन अचंभित करणारे, एहसान व लोई यांच्याबरोबर संगीत दिग्दर्शनात चमकलेले व कां कोणास ठाऊक पण आपलेसे वाटणारे तरुण गायक शंकर महादेवन, तबल्यावर थिरकणाऱ्या बोटांच्या जादूने तालवाद्यांच्या विश्वात अग्रगण्य असलेले जाकिर हुसेन, मेंडोलिन या पाश्चात्य तंतुवाद्यावर बालपणीच अधिपत्य मिळवून त्यावर मधुर शास्त्रीय संगीताचे सूर छेडणारे यू.श्रीनिवास व त्यांच्या जोडीला प्रख्यात जॅझ गिटारवादक जॉन मॅक्लिन व खंजिरावादक सेल्वगणेश यांनी मिळून हिंदुस्थानी व कर्नाटक शास्त्रीय संगीत आणि जॅझ या पाश्चात्य शैलीचे त्रिवेणी फ्यूजन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. (असे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात वाचले.) या कार्यक्रमाची कुणकुण आदल्या दिवशी लागली होती. हा कार्यक्रम संपल्यावर सरोदवादक उस्ताद अमजद अली खॉं यांना साथ करण्यासाठी कदाचित उस्ताद जाकिर हुसेन 'सवाई'मध्ये अचानक येतील अशी आशावादी आंवईसुद्धा उठली होती. एरवी अशा त्रिवेणीच्या अनोख्या संधीचा लाभ जरूर घेतला असता. पण ... 


पुण्यामधील तिसरी वैशिष्ट्यपूर्ण मैफल होऊन गेल्यानंतर व त्याचे सचित्र वर्णन मनोगतावर वाचल्यानंतरच तिच्याबद्दल माहिती मिळाली. अर्थातच पिरंगुटला होऊन गेलेल्या पुणे कट्ट्यावर ती रंगली होती. रावसाहेबांनी मांडलेला या कार्यक्रमाचा जाहीर प्रस्ताव वाचला होता. पहिल्यांदा असे वाटले की मनोगताच्या हजारो सदस्यापैकी अर्धे परदेशात आहेत असे गृहीत धरले तरी भारतातील सभासदांची संख्या चार आकड्यांत जाईल. यातले निम्मे जरी आले तरी एवढे लोक कुठल्या कट्ट्यावर बसू शकतील? त्यांच्यासाठी शामियाना नाहीतर निदान मांडव तरी घालावा लागेल. पुन्हा विचार करतांना वाटले की ही तर खास पुणेकर मंडळींची (कांही लोक याला कंपू म्हणत असतील) अंगत पंगत दिसते आहे. आपण कशाला त्याची वास्तपुस्त करा? आपण आता सायबरखेड्याच्या ग्लोबल व्हिलेजमध्ये राहू लागलो आहो याचे भान राहिले नाही. शिवाय यावेळी सवाई गंधर्वला जायचे आमचे नक्की झालेलेच होते. त्यामुळे रावसाहेबांच्या प्रस्तावावर पुढे जी चर्चा झाली, त्यात कार्यक्रमाची रूपरेखा मांडली गेली, कांही लोकांनी अनुकूल प्रतियाद दिला  तर कांही जणांनी दुरूनच शुभेच्छा पाठवल्या वगैरे सगळे सावकाशीने नंतर वाचले.'सवाई'ला जाण्याच्या धामधुमीत मनोगत वाचायला वेळ मिळाला नव्हता हे एक निमित्त या वेळी झाले असले तरी एकंदरीतच इतर मारुततुल्य वेगवान मनोगतींच्या मानाने आपले सुस्त घोडे वरातीमागूनच रेंगाळत जात असते हेच खरे.


मनोगतावरील मुखवट्यांच्या मेळाव्यात आल्यापासून निदान कांही प्रमुख मुखवट्यामागील चेहेरे कसे दिसत असतील याबद्दल कुतुहल निर्माण होणारच. त्यातील विसोबांना सगळेच तात्या म्हणतात यावरून त्यांचे वापरातले नांव तरी कळले. त्यांचे चतुरस्र लेखन आणि हजरजबाबी प्रतिसाद वाचून व त्यातून व्यक्त होणारा खाणे, पिणे आणि गाणे (यातील क्रम कदाचित चुकला असेल. चू.भू.द्या.घ्या.) यांचा षौक पाहून हा इंटरेस्टिंग (मराठीत काय म्हणतात? 'मनोरंजक' शब्द योग्य वाटत नाही.) हुषार कोकणी माणूस "दिसतो कसा आननी" याची जी उत्सुकता लागली होती त्याचे थोडे समाधान छायाचित्रे पाहून झाले. कट्ट्यावर गेलो असतो तर त्यांची व इतर दादा लोकांची प्रत्यक्ष गांठभेट होऊ शकली असती आणि त्याबरोबरच चंद्रकौंस व यमनाचे सुरेल स्वर तात्यांच्या कंठातून ऐकायला मिळण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला असता. पण ...