तो... मनात माझ्या !

तो इंद्रधनूचा साज लेऊनी..... मनात माझ्या
तो सागरातली गाज होऊनी... मनात माझ्या !


तो हसतो, रुसतो, खुलतो अन गाणेही म्हणतो
तो आनंदाचे झाड होऊनी... मनात माझ्या !


त्या 'राम' म्हणू वा 'कृष्ण' म्हणू, परी सखाच असतो
तो नक्षत्रांची रास होऊनी.... मनात माझ्या !


तो क्षणात... कणात... बेधुंद रानात... कुठे तो नसतो
तो बेहोषीतही भान होऊनी..... मनात माझ्या !


तो अतर्क्याची सीमा लांघुनी हृदयी वसतो
तो युगा- युगाचा ध्यास होऊनी... मनात माझ्या !