--प्रार्थना --

विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर


ही माझी प्रार्थना नाही,


विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये


एवढीच माझी इच्छा.


दु:खतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचं


तू सांत्वन करावंस अशी माझी अपेक्षा नाही;


दु:खावर जय मिळवता यावा


एवढीच माझी इच्छा.


                              जगात माझं नुकसान झालं,


                              केवळ फसवणूकच वाट्याला आली,


                              तर माझं मन खंबीर व्हावं


                              एवढीच माझी इच्छा.


माझं तारण तू करावंस;


मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही ;


तरून जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं


एवढीच माझी इच्छा !


                             माझं ओझं हलकं करून,


                             तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी  माझी तक्रार नाही;


                             ते ओझं वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी,


                             एवढीच माझी इच्छा.


सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन


मी तुझा चेहरा ओळखावा,


दु:खांच्या रात्री जेव्हा,


सारं जग माझी फसवणूक करील;


तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात


शंका मात्र निर्माण होऊ नये,


एवढीच माझी इच्छा ! 


                        - रवींद्रनाथ टागोर *


-------------------------------------------------------------------------------------


*मला ही कविता एका वृत्तपत्रात मिळाली होती , आणि त्यात असं लिहिलं गेलं होतं की ही कविता रवींद्रनाथ टागोर यांच्या 'गीतांजली'तून भाषांतरीत करून घेतली आहे. भाषांतरकाराने त्यांचे नाव लिहिले नव्हते.आणि मी नंतर 'गीतांजली'च्या इंग्रजी आवृत्तीत शोधून पाहिलं तर मला या कवितेच्या समांतर लेखन काही मिळाले नाही.. :(


तरीपण मला हे सांगावंसं वाटतंय की ही कविता फारच सुंदर आहे ...  ज्याने लिहिली तो ग्रेट आहे !!


- गोपू