केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) हे एक कवितेत सामाजिक विचार मांडणारे आद्य कवि होत. त्यांच्या कवितेत मानवता, बंधुता, समता व सामाजिक न्याय ही मूल्ये आढळतात. तुतारी ही त्यांची कविता मराठी काव्यात एक मैलाचा दगड बनून राहिली या कवितेत समाजाला नव्या जाणिवा स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जुन्या टाकाऊ परंपरा व रूढी यांना मागे सारून, समाजाने प्रगतीच्या वाटेने उत्साहाने जावे, असा संदेश या कवितेत ते देतात. मला आवडलेल्या आणि जीवनांत ऊर्जा स्त्रोत बनून राहिलेल्या कांही जुन्या कवितांपैकी ही एक कविता. या कवितेची पहिली तीन कडवी मी मनोगतवर, माझ्या एका विनंतीसह देत आहे. विनंती ही की, दुर्दैवाने पुढची आणखी दोन कडवी मझ्या स्मरणांत नाहीत, कुणा ससिक मनोगतीला माहिती असल्यास कृपया मनोगतवर द्यावी.
तुतारी
एक तुतारी द्या मज आणुनि,
फुंकिन जी मी स्वप्राणाने,
भेदुनि टाकिन सगळी गगने,
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने,
अशी तुतारी द्या मजलागुनि ॥ १ ॥
जुने जाउ द्या मरणालागुनि,
जाळुनि किंवा पुरुनी टाका,
सडत ना एका ठायी ठाका,
सावध! ऐका पुढल्या हाका,
खांद्यास चला खांदा भिडवुनि ! ॥ २ ॥
प्राप्तकाल हा विशाल भूधर,
सुंदर लेणी तयात खोदा,
निजनामे त्यांवरती नोंदा,
बसुनी का वाढवती मेदा ?
विक्रम काही करा, चला तर ॥ ३ ॥