किती दिसांनी.... !

किती दिसांनी तुझी - माझी गाठभेट पडते आहे
तरी नजीक येता येता पाऊल का अडते आहे ?


नेमके काय घडले होते, नेमके कोण चुकले होते
'तू - मी' करता करता कोण कुणास मुकले होते ?
अजूनही का नाते अपुले... अढी मनात धरते आहे
अजूनही कुठले दाटून सल... काय मनात सलते आहे ?


काही विषारी बाण तुझे... काही मीही सोडलेले
कसे बंध तुटून गेले... जिव्हाळ्याने जोडलेले
हवेहवेसे सारे..‌ सारे... सुख निसटून पळते आहे
अजूनही कुठला राग मनात.. काय कुठे जळते आहे ?


शब्दांनीच जळते मन... शब्दांनीच फुलते बाग
शब्दांचीच असते फुंकर... शब्दांनीच पेटते आग
मग कुठले हळवेपण... पाना -पानांत हलते आहे
नेमके काय तुझे मन... माझ्या मनास पुसते आहे ?


किती दिसांनी तुझी - माझी गाठभेट पडते आहे
तरी नजीक येता येता पाऊल का अडते आहे ?