थालिपीठ

  • थालिपीठाची भाजणी ३ वाट्या
  • कांदा १ मोठा
  • कोथिंबीर असल्यास
  • तिखट पूड,हळद
  • तेल परतण्यापुरते
  • आदल्या दिवशीचे वरण उरले असल्यास
१५ मिनिटे
२(बेताचे खाणारे) जण

१. तीन वाट्या भाजणी(भाजणी नसल्यास बेसन आणि ज्वारीचे पीठ १:१ प्रमाणात),कोथिंबीर बारीक चिरुन, वरण असल्यास, कांदा बारीक चिरुन, हळद थोडी,तिखट पूड,मीठ घालून मळावे.(थापण्याइतके पातळ).
२. तीन गोळे करावे. तव्यावर एक गोळा हाताने थापावा. (आधी तव्याच्या पृष्ठभागावर तेल चोळून घ्यावे.) बोटाने ४-५ छिद्रे पाडावी.
३. तवा मध्यम आचेवर ठेवून थालिपीठ एका बाजूने भाजू द्यावे. छिद्रात थोडे तेल सोडावे म्हणजे चिकटायची भिती नाही आणि चव पण छान येते. भाजले गेल्यावर खमंग वास येईलच. एका बाजूने भाजले गेल्यावर उलटावे आणि झाकण ठेवावे. (मधून मधून झाकण उघडून झाले कि नाही पहावे, नाहीतर एक बाजू थालिपीठ एक बाजू कोळसा!!)
झाल्यावर ताटात काढावे. २ तवे असल्यास एक थालिपीठ होईपर्यंत दुसर्‍या तव्यावर दुसरे थापून तयार ठेवता येईल.     

लोण्याच्या गोळ्याबरोबर सही लागते गरम गरम! बांधा विशाल असल्यास दह्याबरोबर किंवा 'सॉस भी कभी टोमेटो था' बरोबर खा.