डू नॉट पास गो(१)

डू नॉट पास गो (जेफ्री आर्चर)
१९८६
शेरीन, हमीद झेबारीची बायको त्याला विमानतळावर सोडायला म्हणून गाडी चालवत होती. हमीदने तिच्याकडे एक नजर टाकली आणि तो स्वतःशीच हसला. पाच वर्षांपूर्वी त्या दोघांनी राजनैतिक आश्रित म्हणून अमेरिकेत पहिल्यांदा पाऊल टाकलं तेंव्हा तो या दिवसाची कल्पनासुद्धा करू शकत नव्हता. पण पाच वर्ष अमेरिकेतल्या मुक्त वातावरणात काढल्यानंतर इथे कुठलीही गोष्ट अशक्य नाही या गोष्टीवर त्याचा हळूहळू विश्वास बसू लागला होता.
"पापा तुम्ही कधी परत येणार?" मागच्या सीटवरून एक चिमणा आवाज आला. हमीदने मागे वळून पाहिलं. त्याच मुलगा नदीम आणि मुलगी मे हे दोघंजण तिथे सीटबेल्ट्स बांधून बसले होते. मे इतकी लहान होती की पापा गावाला जाताहेत म्हणजे काय हेच तिला समजत नव्हतं "पंधरवड्यात परत येतो बघ!" हमीद म्हणाला "मी आलो की आपण खूप मज्जा करू ! "
"पंधरवडा किती लांब असतो?" मागून पुन्हा प्रश्न आला "चौदा दिवस" तो म्हणाला "आणि चौदा रात्री!" असं म्हणत शेरीननी गाडी पार्किंग लॉटमधे थांबवली आणि एक बटण दाबून डिकीचं झाकण उघडलं. हमीदने घाईघाईने त्याच्या सामानाच्या पिशव्या खाली काढल्या. गाडीचं मागचं दार उघडून त्याने आधी त्याच्या मुलीला कडेवर घेतलं आणि मग त्याच्या मुलाला. मेनी भोकाड पसरलं होतं. तो गावाला जात होता म्हणून नाही, तर गाडी थांबली की ती अशीच रडायची म्हणून. पण तिचं रडं थांबवायचा उपाय अगदी सोपा होता. हमीदच्या मिशीच्या जंगलाशी खेळायला लागली की तिचं रडू आपोआप बंद व्हायचं "पापा, बघा हं, चौदा दिवस!" त्याच्या मुलाने त्याला बजावलं.  हसत हसत त्याने त्या तिघांचा निरोप घेतला. खरं म्हणजे चौघांचा कारण त्याचं तिसरं अपत्य जगात येऊ घातलं होतं.
"आम्ही इथेच तुझी वाट पाहू" शेरीननी त्याला ओरडून सांगितलं.
त्याच्या सहा रिकाम्या बॅगा चेक इन केल्यावर तो टर्किश एअरलाइन्स च्या काऊन्टरवर आला. दर वर्षी याच फ्लाईटने दोनदा सफर करत असल्याने त्याला कुणाला काही विचारायची गरज पडली नाही. चेक इनच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या तेंव्हा त्याच्याकडे अजून एक तास रिकामा वेळ होता. वेळ काढण्यासाठी तिथल्या कॉफी काऊन्टरवर जाऊन त्याने कॉफी घेतली. पॅन ऍम कंपनीच्या बी -५ डेस्कवर अर्धा तास आधी जाणाऱ्या लोकांची रांग होती. त्रेसष्ठ डॉलर जादा भरून ही चैन करता येत असे. पण तो नेहेमी त्रेसष्ठ डॉलर वाचवायचा.
 "छे, या अमेरिकनांना चांगली कॉफी करताच येत नाही..." असा विचार करतानाच त्याला अस्सल तुर्की कॉफीची आठवण आली. अर्थात अमेरिका बहाल करत असलेल्या स्वातंत्र्याकडे बघितलं तर तुर्की कॉफीवर पाणी सोडणं हे फारच लहानसं बलिदान होतं...
 लाऊडस्पीकरवरून त्याच्या तिकिटाच्या रांगेतल्या प्रवाश्यांना विमानात चढायला सांगितल्यावर तो तत्परतेने आत गेला. त्याला इकॉनॉमी क्लासमधली दोन रांगांच्या मधली, वाटेजवळची जागा मिळाली होती.
 "अजून अशा फक्त दहा खेपा, की मग  आपण बिझिनेस क्लास मधून जाऊ शकू" तो स्वतःशीच म्हणाला.
आता तो त्याच्या ओळखीच्या प्रदेशात चालला होता. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याच्या आश्रयदात्या देशाचा मनोमन कृतज्ञतेने निरोप घेतला  विमानाने आकाशात झेप घेतली तेंव्हा त्याच्या मनाने पाच वर्ष मागे भरारी मारली होती.
...दोन वर्षं कृषी मंत्री म्हणून काम केल्यानंतर सद्दामने त्याची कॅबिनेटमधून हाकालपट्टी केली होती. त्या वर्षी गव्हाच्या पिकाची वाट लागली होती. पीपल्स आर्मीचा वाटा, दलालांचा वाटा वजा जाऊन इराकी जनतेच्या वाट्याला आलेला गव्हाचा साठा फारच तोकडा होता. या परिस्थितीचं खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडणं भाग होतं आणि (या कामाला) / (बळीचा बकरा बनवायला) कृषी मंत्र्याइतका लायक माणूस दुसरा कोण असणार?  हमीदचे वडील एक साधे गालिच्यांचे व्यापरी होते. त्यांची इच्छा होती की हमीदने घरच्याच व्यवसायात लक्ष घालावं. या जगातून जाण्यापूर्वी त्यांनी हमीदला बजावून सांगितलं होतं की कृषी खातं घेऊ नकोस कारण त्या पदावरची मागची तीन माणसं त्यांचं मंत्रीपद काढून घेतलं जाऊन नाहीशी झाली होती. इराकमधे 'नाहीसं होणं' म्हणजे काय हे सर्वश्रुतच होतं. पण महीदने ती जबाबदारी स्वीकारली. पहिल्या वर्षी पीक चांगलं आलं होतं. "शेवटी कृषी खातं ही शिडीची पहिली पायरी आहे आणि खुद्द सद्दामने नुकताच आपला उल्लेख माझा जवळचा मित्र असा नव्हता का केला?" त्याने स्वतःला समजावलं होतं. वयाच्या बत्तीसाव्या वर्षी सगळ्यांनाच वाटतं की आपण अमर आहोत म्हणून...
त्याच्या वडिलांची भविष्यवाणी खरी ठरली. आणि सद्दामची गैरमर्जी झाल्याबरोबर त्याचे सगळे 'जवळचे मित्र' वाळवंटात पडलेल्या बर्फाच्या तुकड्याप्रमाणे अदृश्य झाले.
भविष्याची तरतूद मात्र हमीदने काळजीपूर्वक केली होती. दर आठवड्याला त्याच्या कॅबिनेट मंत्रयाच्या खात्यातून तो गरजेपेक्षा थोडीशीच जास्त रक्कम काढायचा. आणि हे जादा पैसे रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या दलालांकडून अमेरिकन डॉलर्स मधे बदलून घ्यायचा.दर वेळी थोडेच पैसे बदलून घेण्याची आणि एकाच दलालाकडे दुसऱ्यांदा न जायची काळजी मात्र त्याने घेतली होती.  हो कारण इराकमधे सगळेजणच गुप्तहेर होते...
ज्या दिवशी त्याला पदच्युत करण्यात आलं त्या दिवशी गादीखाली ठेवलेल्या नोटा त्याने मोजल्या. त्याच्याकडे एकंदर अकरा हजार दोनशे एकवीस अमेरिकन डॉलर्स जमले होते.
बगदादमधे आठवडा गुरुवारी संपत असल्यामुळे त्याच आठवड्यातल्या गुरुवारी पहाटे त्याने आणि त्याच्या बायकोने अर्बिलला जाणारी बस पकडली. त्याची मर्सीडीज मुद्दामच त्याच्या भल्याथोरल्या शासकीय निवासस्थानासमोर उभी करून ठेवलेली होती. त्या दोघांजवळचं सामान म्हणजे फक्त त्यांचे दोघांचे पासपोर्ट्स, त्याच्या बायकोच्या ढगळ कपड्यांमधे लपवलेल्या डॉलर्सच्या नोटा आणि सीमेपर्यंत पोहोचायला पुरतीक इतके दिनार. बस्स.
अर्बिलला जाणाऱ्या बसमधे कोणीही त्यांचा शोध घेणार नव्हतं. अर्बिलला पोचल्यावर त्यांनी सुलेमानियापर्यंत एक टॅक्सी केली. त्याच्याकडचे जवळ्जवळ सगळे दिनार एव्हाना संपले होते. सुलेमानियामधे एका स्वस्त हॉटेलमधे ते दोघे रात्रभर सकाळची वाट बघत जागत बसले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे एका बसमधून ते कुर्दिश्स्थानला निघाले. संध्याकाळी ते कुर्दिश पर्वतरांगांच्या पायथ्याशी झोखोला पोहोचले. इथून पुढचा प्रवास सगळ्यात संथ गतीने झाला. एका कुर्दिश स्मगलरने दोनशे डॉलर्सच्या मोबदल्यात (तो दिनारांकडे बघायलाही तयार नव्हता ! ) खेचरांच्या पाठीवरून त्यांना तुर्की सीमेजवळ आणून सोडलं. तिथून तुर्कस्तानमधल्या पहिल्या गावापर्यंतचा प्रवास त्यांनी पायी करायचा होता. पहाटे त्यांनी चालायला सुरुवात केली आणि संध्याकाळी ते किमझी रेंगा नावाच्या गावात पोहोचले. रेल्वे स्टेशनवर त्यांनी अजून एक रात्र जागून काढली. पहाटे त्यांना इस्तंबूलला जाणारी गाडी मिळाली. हमीद आणि शेरीन शरणागत म्हणून तुर्कस्तानच्या राजधानीत - इस्तंबूलला येऊन पोहोचले. तिथे पोहोचल्यावर सर्वप्रथम हमीदने इझ बॅंकेत जाऊन त्याच्याजवळचे दहा हजार आठशे डॉलर्स भरून टाकले. मग तो अमेरिकन दूतावासात गेला. त्याचा आणि बायकोचा पासपोर्ट तिथे देऊन त्याने राजनैतिक शरणागतीची याचना केली. त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं की नुकताच पदच्युत झालेला इराकी कॅबिनेट मंत्री म्हणजे अमेरिकन लोकांसाठी हवीहवीशी गोष्ट असते.
अमेरिकन दूतावासाने एका पंचतारांकित हॉटेलमधे त्यांची राहण्याची व्यवस्था केली आणि तडक मायदेशी खलिता रवाना केला. वॉशिंग्टनकडून काय उत्तर येतंय यावर पुढचं सगळं अवलंबून होतं आणि ते उत्तर मिळताक्षणीच ते त्याला कळवणर होते .पण या सगळ्याला नक्की किती वेळ लगेल हे कोणीच सांगू शकत नव्हतं. या वेळेचा सदुपयोग करायचं हमीदने ठरवलं. इस्तंबूलमधल्या गालिच्यांच्या बाजारपेठेत त्याच्या वडिलांना चांगली पत होती. त्याने या बाजारपेठांमधे फेरफटका मारला. त्याच्या वडिलांच्या कितीतरी मित्रांनी त्याच्या वडिलांच्या व्यापारी कौशल्याच्या, त्यांच्या कितीतरी लिटर कॉफी पिण्याच्या आठवणी काढत त्याची चांगली सरबराई केली. विशेषतः तो अमेरिकेला जाणार आहे आणि तिथे उदरनिर्वाहाच्या त्याच्या काय योजना आहेत हे ऐकून तर ते फारच खूश झाले.
आठवड्याभरातच झेबारी कुटुंबाला अमेरिकेचा व्हिसा मिळाला आणि अमेरिकन सरकारच्या खर्चाने ते वॉशिंग्टनला रवाना झाले. त्यांच्या सामानात तेवीस तुर्की गालिच्यांचा समावेश होता.
वॉशिंग्टनला पोहोचल्यावर सी आय ए कडून  पाच दिवस हमीदची कसून चौकशी झाली. शेवटी त्याने केलेल्या बहुमोल अशा मदतीबद्दल त्याचे आभार मानण्यात आले आणि त्याला सोडून देण्यात आलं. हमीद, त्याची गरोदर बायको  आणि तेवीस गालिचे न्यू यॉर्कला दाखल झाले. मॅनहॅटनच्या पूर्वभागात योग्य दुकान शोधून काढायला हमीदला सहा आठवडे लागले. त्या दुकानदाराशी पाच वर्षांचा करार केल्यावर त्यांनी एक भाड्याचं घर घेतलं आणि अभिमानाने आपल्या नवीन नावांची पाटी दाराबहेर लावली.
त्यानंतर तीन महिन्यांनी त्याने त्याच्याकडचा पहिला गालिचा विकला तेंव्हा त्याच्याकडची शिल्लक गंगाजळी संपत आली होती. अमेरिकेत गेल्याला एक वर्ष पूर्ण झालं तेंव्हा त्याने तेवीसपैकी सोळा गालिचे विकले होते. त्याच्या लक्षात आलं की लौकरच त्याला इस्तंबूलला एक फेरी मारावी लागणार आहे.
या गोष्टीला आता चार वर्षं झाली होती. नुकतंच झेबारी कुटुंब पश्चिम भागात, दुकानाच्या वरच्या मजल्यावर एका लहानश्या पण स्वतःच्या अपार्टमेंटमधे रहायला गेलं होतं. हमीद शेरीनला नेहेमी म्हणायचा की ही फक्त सुरुवात होती. तो आता स्वतःला पूर्णपणे अमेरिकन समजायला लागला होता. अमेरिकेने बहाल केलेल्या निळ्या पासपोर्टच्या पुस्तकाचा त्याला अभिमान होता. सद्दाम असेपर्यंत तो कधीच त्याच्या देशात जाऊ शकणार नाही हे त्याला ठाऊक होतं. त्याचं घर आणि इतर मालमत्ता केंव्हाच सरकारजमा झाली होती आणि त्याला फाशीची शिक्षा घोषित झाली होती. आपण आयुष्यात कधीही बगदादमधे पाऊल टाकू शकणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं. ...
लंडनला इंधन भरून घेतल्यावर त्याचं विमान वेळेच्या आधीच इस्तंबूलच्या अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. हमीदने त्याच्या नेहेमीच्या हॉटेलमधे जागा राखून ठेवली होती. इस्तंबूलच्या गजबजलेल्या वातावरणात आल्यावर त्याला खूप बरं वाटलं. या दोन आठवड्यांचा सदुपयोग कसा करायचा याचे आडाखे बांधायला त्याने सुरुवात केली.
या खेपेला त्याला जवळजवळ साठ गालिचे विकत घ्यायचे होते. एकूण एकतीस दुकानदारांना भेट द्यायची होती. त्याचे पुढचे चौदा दिवस गडबडीचे जाणार होते. कारण अस्सल आणि कडक तुर्की कॉफीचे बुधलेच्या बुधले रिचवत त्याला गालिच्याच्या योग्य किमतीसाठी घासाघीस करावी लागणार होती. दुकानदाराने सुरुवातीला सांगितलेली किंमत ही गालिच्याच्या मूळ किमतीपेक्षा तिप्पट असते हे त्याला माहीत होतं. त्यामुळे तासन.ह तास बोलणी केल्यावर शेवटी हमीदच्या मनात असलेला आकडा ऐकायला मिळायचा. पण त्याच्या वडिलांप्रमाणेच हमीदलाही हा सगळा प्रकार मनापासून आवडायचा.
पंधरवडा उलटला तेंव्हा एकवीस हजार डॉलर्सच्या मोबदल्यात हमीदने सत्तावन्न गालिचे घेतलेले होते. हा माल उत्कृष्ठ तर होताच पण न्यू यॉर्कच्या चोखंदळ रसिकांच्या पसंतीला उतरणाराही होता हे हमीदला अनुभवाने माहीत होतं. हे गालिचे विकून त्याला कमीत कमी एक लाख अमेरिकन डॉलर्स नक्कीच मिळाले असते. तो स्वतःवरच खूश झाला. आत्ताच आपण पॅन ऍमच्या फ्लाईटने का जाऊ नये? त्याने स्वतःलाच विचारले. याच क्षणाची वाट बघत त्याने दर वेळी त्रेसष्ठ डॉलर्स नव्हते का वाचवले!
तो शेरीन आणि मुलांना भेटायला अगदी अधीर झाला होता. विमान सुटायच्याही आधीच पॅन ऍमच्या अमेरिकन हवाई सुंदरीचा न्यू यॉर्क अक्सेन्ट आणि आश्वासक हास्य यामुळे त्याला घरच्यासारखं वाटायला लागलं होतं. जेवण झाल्यावर सिनेमा बघण्याऐवजी झोप काढायचं त्याने ठरवलं. २०२५ मधे त्याचा मुलगा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला आहे अशी गोड स्वप्नं रंगवत तो गाढ झोपी गेला.

--अदिती
(१७.१.००७)