श्वास असे संपता संपता
धुसर नजरेत येशिल तू
अंधुकसा
हाती हात धराया
चालताना ही दुरची वाट......
अन सहज सुटेल तुझी तळव्यावरील अलगद पकड
माझ्या थंड स्पर्शान........
पहात रहाशील नजरेत माझ्या
जपून ठेवलेलं तुझं खट्याळ हसू......
हिशोब क्षणांचा मागशील का?
एकमेकांस हरवणाऱ्या
खुणा साऱ्या पटतील का?
रेशिमगर्भी गाठींच्या
कशिदाकारी स्मरतील का?
मावळणारी पश्चिमा
तुझ्या माझ्या आसवांनी
अस्ताच्या मित्राला
आलिंगन देईल का?
नको ना रे अशा कातरवेळी
डोळ्यांच्या कडांनी
चंद्रवेळेच्या शपथा घालूस
पहाना तुझ्या टपोऱ्या पापण्यांत
ओसंडतेय माझी जिव्हाळ पौर्णिमा..........!
शीला.