तुझ्या असण्यामुळं!!!

तुझ्या असण्यामुळं
जगणं थोडं सुसह्य झालंय
तुझ्यामुळं मला हक्काचं
विसाव्याचं स्थान मिळालंय...

माहित आहे मला...

वादळ थोपवायला
तूही असमर्थ आहेस नि मी ही
पण वादळं झेलण्याचं नि पेलण्याचं
तुझ्यामुळंच मला सामर्थ्य मिळालंय...

माहित आहे मला...

या भरकटलेल्या गलबताला
तू दिशा नाही दाखवू शकत
पण नांगर टाकून स्थिर होण्यासाठी
तुझ्यारुपी एक बेट मिळालंय...

माहित आहे मला...

घाव घालणारे घाव घालतच जाणार
तुकडे तुकडे होतच राहणार
घातलेले टाके उसवतच राहणार
धबधब्यासारखं जन्मभर कोसळतच राहणार...

पण यातून सावरण्यासाठी
मला तुझं दान मिळालंय
तुझ्या असण्यामुळं
जगणं थोडं सुसह्य झालंय...