असे का?

आयुष्याची सगळी वर्षं सरून गेली
सारा भविष्यकाळ भूतकाळात भरून गेली ...

आनंदाने उडणार्‍या नाजूक फुलपाखराला
हृदयावर खोल खोल जखम करून गेली...

सुखाच्या थेंबासाठी मीच चातक झाले
पावसाची उरली आशा विरून गेली ...

चैतन्याचा उत्साहाचा खळखळता धबधबा माझा
ज्वालामुखींची मालिका त्याच्या वरून गेली ...

आशेने उमेदीने बांधलेले सारे मनोरे
नशिबाच्या जुगारात सारी उमेदच हरून गेली...

वसंताचा कोकिळ गाऊ लागे दाराशी
तेव्हाच नियती शिशिराचे सूतोवाच करून गेली ...

आयुष्याचे तानेबाने अर्धेच चढले मागावर
आयुष्याच्या किनारीची जरतार विरून गेली ...

भोवर्‍यात अडखळली डगमगली नाव माझी
मी बुडाले, वाचवणारी माणसे तरून गेली ...

भर मध्यान्हीच सांज उन्हं अंगणात दाटून आली
ग्रहणकाली प्राणपाखरं क्षितिजाला धरून गेली ...

काजळीसारखं अस्तित्व मागे ठेवायचं नव्हतं पण
जन्माला येतानाच माझी जीवनकथा मरून गेली ...