पंतसचिवांचा वाडा चांगलाच ऐसपैस आहे. काही भाग दुमजली आहे. वाड्यात पाणी नाही, पण आणून भरून ठेवायची सोय आहे. बाजूच्याच एका खोलीत एक कुटुंब वसतीला आहे, आणि वाड्याच्या मधल्या चौकात त्यांच्या कोंबड्या खेळत असतात. त्या बघून या बहुतेक भाविकांनी प्रसादासाठी आणल्या असाव्यात अशी आशा माझ्या मनात निर्माण झाली होती पण तसे काही नव्हते. सरपण इतके विपुल की पहाटे थोडीशी थंडी बघून लगेच एक मोठी शेकोटी पेटवली होती तिथल्या पुजाऱ्याने.
वाड्याच्या मागेच एक खोल कोरडी पण वैशिष्ट्यपूर्ण अशी चौकोनि विहिर आहे, तिच्या खोलवरच्या भिंती एकदम काळ्याठिक्कर दिसत होत्या, आत पूर्वी आग लागली असावी असा तर्क केला. बाजूलाच भोरेश्वराचे देऊळ आहे, पण गडावरील भोराईदेवीचे मुख्य देउळ जरा दूर आहे. गडाचा हा पारिसर दाट वृक्षराजीने व्यापला आहे, त्यामुळे या हिरवाईतून चालतांना उन्हातही गारवा जाणवतो. उत्तरेकडे थोडे उतरून गेलो आणि मजबूत तटबंदी दिसली, त्या तटबंदीतच मोठ्या कौशल्याने एक चोरदरवाजा लपवला आहे. भुयारासारख्या आत आत जाणाऱ्या त्या रस्त्याच्य भिंतीही विहिरीसारख्याच काळया बघून आश्चर्य्च वाटले. आणि आत शेवटपर्यंत जायचे तर त्या भिंतींना घासत जावे लागेल एवढे अरुंद ! मग मनोजने थोडे आत जाउन पाहिले तर ते हजारो काळ्या कुळकुळीत कोळ्यांचे पुंजके होते, आणि चाहूलीने बिथरून ते टपाटप जमिनीवर पडुन तुरुतुरू पळापळ करू लागले. तटबंदीच्या या भागात साधी आणि लंगूर अशा दोन्ही प्रकारच्या माकडांच्या टोळ्या होत्या, पण आम्हाला पहाताच त्यांनी दुऱ पळ काढणेच पसंत केले.
पुन्हा वर चढून आलो आणि भोराईदेवीच्या प्रशस्त देवळाकडे आलो, समोर दीपमाळ आहे, देवीसमोर शंक्रासमोर नंदी असतो त्या ठिकाणी आणि तशाच पोझमध्ये वाघ आहे. देवळातही दहा वीस जण सहज झोपू शकतील एवढी जागा आहे. मागे एक गट इथे झोपला असतांना छतावरून एका उंदरासकट घोणस पडला होता. त्या लोकांनी त्याचे छायाचित्रण करून ठेवले आहे.
देवळासमोर पुन्हा थोडे सपात माळरान आहे, आणि तिथुन सह्य्राद्रीच्या मुख्य रांगेचे खूप जवळुन दर्शन घडते. एकेमेवाद्वितीय अशी तेलबैलाची भिंत तर अगदीच समोर उभी ठाकलेली दिसते, तिथुन सवाष्णी घटाने उतरून सुधागडवर सात एक तासात येता येते. सुधागड कोकणातला किल्ला असूनही त्याचा माथा जवळ जवळ सह्यपठाराच्याच पातळीला भिडला आहे. वायव्येला पाहिले असता पालीचा सरसगड अगदीच ठेंगणा दिसतो, पण तो चढतांना काही तसे वाटले नव्हते. तेलबैलाच्या उजवीक्डे पिटुकला चौकोनी ठोकळा म्हणजे धनगड दिसतो. आणि त्याच्या बाजूला नवरानवरी. सह्याद्रीचा हा सगळा देखावा हे सुधागडाचे अजून एक खास वैशिष्ट्य.
सुधागडावर धोंडसे गावाकडूनही एक वाट येते आणि त्या वाटेवर रायगडासारखाच सुरेख महादरवाजा लागतो असे वाचले होते, तो पहाण्यासाठी धोंडसेकडे उतरू लागलो. दहा पंधरा मिनिटे उतरल्यावर अप्रतिम गोमुखी भव्य प्रवेशद्वार लागले. हे पूर्वी बुजलेले होते पण मुंबईच्या काही गिरीयात्रींनी बरेच श्रम करून मोकळे केले असे ऐकले. पायऱ्यांवर सापाची एक अखंड कात सापडली, ताजीच असावी, डोळे सुद्धा स्पष्ट दिसत होते. मग़ आजूबाजूला पाहिले तर सापांच्या कातीच काती लटकत होत्या.
वर चढून आलो, डावीकडच्या सह्यरांगांकडे बघत बघत दक्षिणेला टकमक टोकावर पोहोचलो, वाटेत विसाव्याला एका गर्द सावलीच्या झाडाखाली छान पार बांधला आहे. टकमक टोकाच्या बाजूला गडाचे अजून एक निमुळते टोक आले आहे, आणि या दोन्हीकड्यांमध्ये ध्वनी प्रतिध्वनींचा खेळ चांगलाच रंगतो. स्थानिक लोक त्याला बोलता कडा म्हणतात. आधी शिवरायांच्या नावाचा गजर केल्यावर मग एकमेकांच्या नावानेही शंख केला आणि परत फिरलो.
गडाच्या पूर्व बाजूला चांगलाच मोठा तलाव आहे, ते जवळ गेल्याशिवाय लक्षात आले नव्हते. तलावात म्हशी मजेत डुंबत होत्या, आता उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता त्यामुळे आम्हालाही मोह आवरत नव्हता, पण तसेच खाली उतरू लागलो. जवळचे पाणी संपले होते, पाणी कुठे मिळेल ते नीट समजून घेतले. उतरतांना पाच्छापूर दरवाजाच्या वरच्या बाजूला कड्याला लगटून एक वाट गेली आहे, तिथेच उंबराखाली अति मधुर आणि थंड पाण्याचे एक टाके आहे, तिथे थोडा वेळ मुक्कामच ठोकला. ग्लुकॉन डी ची एक छोटी पार्टी करून पुन्हा खाली उतरू लागले त्याही वाटेवरचा एक आणि पश्चिमेकडचा एक असे दोनही बुरूज त्यातले भुयारी दरवाजे आणि नाळ हे सर्व बघण्यासारखे होते.
साडेबाराला खाली उतरायला सुरूवार केली, उन्हात तापून तापून ठाकुरवाडीला पोहोचलो तर तिकडे दारु पिऊन धुळवड चालू होती. त्यांनी अडवून पैसे मागायला सुरूवात केली, त्यांना मनोजने बोलण्यात गुंतवले आणि बाकीच्यांनी खुष्कीच्या मार्गाने पायथ्याला उभी केलेली गाडी गाठली. रस्त्यातही दोन तीन ठिकाणी असेच रस्ता अडवून पैसे मागणे सुरू होते. खर तर गावाकडच्या लोकांचा असा अनुभव कधी येत नाही, नेहेमी प्रेमळ आदरातिथ्यच वाट्याला येते.
पालीला पोहोचल्यावर किती पेले लिंबू, कोकम, आवळा, सरबत रिचवले त्याची गणतीच नाही. लोणावळ्याला अन्नपूर्णामध्ये जेवून सातच्य आत घरात पोहोचलो, ते रहाण्याची उत्तम सोय, मुबलक पाणी, विपुल सरपण, गडावर आणि आजूबाजूलाही पहाण्यासारखे बरेच काही अशा सर्व वैशिष्ट्ट्यांमुळे आम्हाला आवडलेल्या या सुधागडावर पुन्हा कधीतरी रहायला यायचे बेत करतच.
मनोजने काढलेले काही फोटो