ट ला ट री ला री

      मंदाताईकडे जायला मला निमित्त लागत नाही.तेथे मला नेहमीच मुक्तद्वार असते.त्या दिवशीही कॉलेजमधून येताना मनात आले आणि तिच्या घरात शिरलो. नेहमीप्रमाणे ताई आणि बापू गप्पा मारत बसले होते." घ्या आले तुमचे बंधुराज " असं नेहमीप्रमाणे माझ गडगडाटी स्वागत बापूनी केल.मी काही बोलण्यापूर्वी जणु माझा पाठलाग करीत आल्यासारखा संजू माझा भाचा , ताईचा मुलगा घरात शिरला.त्याच्या हातात दोन सुंदर गुळगुळीत मुखपृष्ठे असलेली पुस्तके होती.संजू इंटीरियर डेकोरेटरचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्याच्या व्यवसायाशी संबधित ती असावीत असा माझा अंदाज होता पण त्याने ती टेबलावर जवळजवळ आदळलीच त्यामुळे माझे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि पुस्तकावरील नावे वाचून मी तीन ताड उडालोच.कारण एका पुस्तकाचे नाव होते `प्रल्हादले ` आणि दुसऱ्याचे होते 'पटपोचंपी'.या नावांवरून ती त्याच्या व्यवसायासंबंधीची नसावीत हे ताबडतोब माझ्या लक्षात आले म्हणून ती हातात घेऊन चाळू लागलो तर ते काव्यसंग्रह निघाले.आणि मी अगदी चीतच झालो कारण काव्याची आवड संजूला किती आहे हे मला चांगलेच माहित होते. त्यामुळे त्याच्या हातात काव्यसंग्रह म्हणजे भुताहाती भागवत अशातला प्रकार होता म्हणून मी एकदम त्याच्यावर जवळजवळ ओरडलोच
" अरे संजू ही काय भानगड आहे एकदम दोनदोन कवितासंग्रह ?इंटीरियरमध्ये भिंतीवर काव्ये लिहायची पद्धत निघाली आहे का ?"
"मला वाटलेच होते असा काहीतरी गैरसमज होणार सगळ्यांचा पण आत्ताच त्या बर्दापुरकरांकडे गेलो होतो आणि त्याना म्हणे प्रीती म्हणाली होती---"  
ही प्रीती म्हणजे संजूची बायको आत कामात होती तरी आपला उद्धार झाल्याचे बरोबर तिच्या कानावर पडले आणि ' काय काय मी काय म्हणाले ?" संजूला वाक्यही पुरे करू न देता तरातरा बाहेर येऊन तिने विचारले.ती बाहेर आल्यामुळे मोकळेपणाने तिच्यावर तोंडसुख घेण्याची संधी आपण गमावली हे संजूच्या लक्षात आले.आणि स्वतःला सावरुन घेत तो म्हणाला
" अग हेच ग त्यादिवशी आपण बर्दापुरकरांकडे गेलो तेव्हा तू म्हणाली नाहीस का की तुला काव्याची खूप आवड आहे "
" अस म्हणाले का मी ?"त्यावर उसळून प्रीती म्हणाली,"तुला माहीत आहे ना मला काव्याची किती आवड आहे " " हो तर म्हणून तर तुझ्याशी लग्न केले ना मी " आता त्याना अधिक बोलू दिले तर काव्याची गंगा प्रीतीच्या डोळ्यातून वहायला लागायची म्हणून मध्ये हस्तक्षेप करीत मी म्हणालो
"अरे हो हो काव्य म्हणजे अगदी काहीतरी भयानक चीज असल्यासारख बोलताय,प्रीती मग तू काय बोलली होतीस बर्दापुरकराना की संजूवर ही आपत्ती कोसळली ?"
"काही नाही त्यादिवशी बोलताबोलता ब्रदापूरकर काव्य करतात असे म्हणाले तेव्हा  मी एवढेच म्हणाले की आम्ही साहित्यात रस घेणारी मंडळी कधीकधी एकत्र बसून एकमेकाचे किंवा एकमेकाना आवडलेले साहित्य वाचतो त्याच्यावर चर्चा करतो  मग झाल तेच निमित्त साधून त्यानी त्यांचे नुक्तेच प्रकाशित झालेले हे दोन काव्य संग्रह --" "आपल्याला भेट म्हणून ---?" त्याचे वाक्य पुरेही होऊ देता प्रीती उद्गारली,वाचायचे नसले तरी भेट मिळाल्याचा आनंद ती लपवू शकली नाही पण संजूच्या पुढच्या वाक्याने तिच्या आनंदावर पाणी पडले कारण तिला मध्येच थांबवीत संजू म्हणाला,"थांब तुझा गैरसमज होतो आहे,ही दोन पुस्तक मी विकत घेतलीत." : काय विकत घेतलीस ?" राघोबाना रामशास्त्र्यानी देहांत प्रायश्चित्त सुनावल्यावर आनंदीबाई आणि राघोबा या दोघानी एकदम " काय देहांत प्रायश्चित्त ?"  हा प्रश्न विचारावा अशा थाटात प्रीती ने  विचारले आणि त्या प्रश्नास  ज्या शांतपणे आणि ठामपणे रामशास्त्र्यानी उत्तर दिले त्याच शांतपणे "होय विकतच घेतली " असे उत्तर संजूने दिले तरीही प्रीतीचा काही त्यावर् विश्वास बसेना तेव्हा शेवटी ,"आता कस सांगू म्हणजे तुझा विश्वास बसेल?ठीक आहे ही पावतीच बघ तीनशे रुपयांची पुस्तकांच्या किंमतीची !" हातात पावतीचा कागद फडकवत संजू म्हणाला तेव्हा  मात्र प्रीतीची खात्री पटली.आणि नवऱ्याने तीनशे रुपये फुकट घालवले या कल्पनेने भडकून ती म्हणाली,"पण तुला हा अगाउपणा करायला कुणी सांगितला होता ?त्याना सांगायच नाही का प्रीती स्वतःच घेऊन जाईल म्हणून म्हणजे मी बरोबर कटवल असत त्याना "
" माझा पण ते विकत घ्यायचा विचार नव्हताच पण बर्दापूरकर म्हणाले तुमच्या मिसेसना साहित्याची बरीच गोडी दिसतेय त्याना माझे हे दोन नुकतेच प्रकाशित झालेले काव्यसंग्रह आवडतील ते घेऊन जा .अस म्हटल्यावर मला वाटल ते तुला भेट म्हणूनच देत आहेत !"
"आणि मग ?" प्रीतीने किंचाळून विचारले ," मग काय त्यापाठोपाठ ही पावतीही फाडून हातात ठेवल्यावर आता नको अस थोडच म्हणता येतय.बर जाऊदे आता आलेच आहेत अनायासे घरात तर वाचून टाक बर " संजू खोडसाळपणे म्हणाला,त्यावरील प्रीतीची प्रतिक्रिया अपेक्षित अशीच होती, " हे बघ ते कवितासंग्रह द्या म्हणून मी काही बर्दापूरकराना लोणी लावायला गेले नव्हते,ते तू आणले आहेस चांगले तीनशे रुपये घालवून आता ते वाचायची जबाबदारी तुझी "
" हे बघ तूही वाचू नकोस आणि मीही वाचत नाही मग तर झाल.तीनशे रुपयांच एवढ काय लावून घेतीस ?बर्दापूरकर  चार पाच लाखांच काम देणार आहेत मला तेव्हा त्यासाठी काव्यसंग्रह विकतच घ्यायची नव्हे तर ते वाचून त्यांचे रसग्रहण करायचीही तयारी आहे आपली." आपल्या नवऱ्याचा हा व्यावहारिक दृष्टिकोण प्रीतीला एकदम पटला.पण कवितासंग्रहाच्या नावामुळे माझी उत्सुकता चाळवली गेली होती म्हणून ते हातात घेत मी म्हणालो,"पण या पुस्तकांच्या नावांचा अर्थ काय ग ताई ?"
" बघू आण इकडे " इतकावेळ संभाषणात भाग घेता न आल्यामुळे बेचैन झालेल्या ताईला माझ्या प्रश्नाने हवी असलेली संधी मिळाली. अलीकडे कंपवातामुळे थरथरणारे तिचे हात एकदम दोन कवितासंग्रह हातात घेताना अधिकच थरथरत आहेत असा भास मला झाला त्यामुळे चेष्टेने मी म्हणालो,"अग ताई एवढे हात थरथरायला ते काही बापुरावांचे प्रेमपत्र नाही." " चल उगीच चावटपणा करू नको,"माझ्यावर डोळे वटारत ताई म्हणाली आणि त्याला पुढे पुरवणी जोडत म्हणाली, " आता एवढे मात्र खरे की त्या पत्रातल यांच अक्षर लावणे म्हणजे महाकर्मकठीण काम  असायच आणि जी काही वाचता यायची त्यांचा अर्थ लावणे हे त्याहूनही कठीण" " म्हणजे अगदी दा विंचि कोड उलगडण्याइतकच का?" मी आपल ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न केला. पण तिकडे पूर्ण दुर्लक्ष करीत बापूरावनी "म्हणून तर तुझ्यासारखी मास्तरीण बायको केली" हे आपल भरतवाक्य म्हटले आणि वर तिला जणु आव्हानच दिले "तेव्हा मास्तरीणबाई आता मुद्द्याच बोला आणि अर्थ सांगा " निवृत्त झाल्यापासून ताई हल्ली काही काही लिहू लागली होती आणि ते कोठेकोठे प्रसिद्धही होऊ लागल्यामुळे हे साहित्यिक आव्हान स्वीकारणे तिला क्रमप्राप्त होते." काय तुझ्या डोक्यात काही उजाडले का ?"  प्रल्हादले या शब्दावर विनोद करण्याचा प्रयत्न करत मी म्हणालो.पण ताईने एकदम सिक्सरच मारला " अरे सोप आहे " पुस्तक उघडून चाळत ती म्हणाली," कवीच नाव प्रल्हाद आहे त्याला झालेली जाणीव म्हणजे प्रल्हादले " " माझा तर्क वेगळाच आहे,"मी आपली अक्कल पाजळली,"मला वाटत प्रल्हादाची दळे असा हा षष्ठी तत्पुरुष आहे त्याचा अर्थ प्रल्हादान लिहिलेली पाने ' तेवढ्यात् संजूलाही स्फूर्ती आली "अरे मामा,प्रल्हादाची दले म्हणजे पूर्वी आपल्या सैन्यात चतुरंग दले असायची तशी प्रल्हादाचे काव्यसैन्य आपल्यावर हल्ला करत आहेत." "आणि आमचा पार धुव्वा उडवत आहेत " त्याच्या सुरात सूर मिसळून प्रीतीन आपला राग व्यक्त  करून तीनशे रुपये वसूल करण्याचा प्रयत्न केला." बर हे पटपोचंपी काय प्रकरण आहे ?"आता बापूरावनाही उबळ आली "मला वाटत ते सरळ पोपटपंची असावे"असा अभिप्राय नोंदवीत ते म्हणाले आणि मलाही तो पटण्यासारखा वाटला पण ताईसाहेबाना स्फूर्तीचा झटका आला होता त्यामुळे तिला गप्प रहाणे अशक्य झाले असावे,"हे बघ त्यात एक मात्रा कमी पडली आहे " हा तिचा उद्गार ऐकल्यावर,"म्हणजे तुला लगेच गणमात्रा पण कळल्या वाटत " असा शेरा मी मारलाच."अरे ती मात्रा नव्हे अक्षरावरील मात्रा"ती मला पटवण्याचा प्रयत्न करत म्हणाली."आता कसली मात्रा ? आता मात्र तुझ्यापुढे कुणाची मात्रा चालणार नाही"मी आणखी अक्कल पाजळली .
"अरे पटपोचंपी मधल्या पो वर अजून एक मात्रा म्हणजे ते पटपौचंपी असे हवे " इति ताई
" मग त्यातून अर्थ निघणार का?" मी उपरोधाने म्हणालो
"निघणार म्हणजे काढता येईल " सावधगिरीने ती म्हणाली,"मग सांगा तो आम्हाला" गीतेमध्ये अर्जुनान श्रीकृष्णाला अवघड प्रमेयाचा अर्थ विचारावा अशा थाटात मी म्हणालो
" अरे अस बघ पट म्हणजे वस्त्र म्हणजे काव्यरूपी वस्त्र बर का पौ म्हणजे पौर्णिमा,चं म्हणजे चंद्र आणि पी म्हणजे पीयुष म्हणजे अमृत म्हणजे हे काव्यरूपी वस्त्र पौर्णिमेच्या चंद्राच्या चांदणेरूपी अमृतासारखे आहे"ताईच्या मुद्रेवर विक्रमादित्यान वेताळाच्या अवघड प्रश्नास उत्तर दिल्यावर दिसणाऱ्रा जितं मया असा भाव दिसत होता.मात्र आम्ही वेताळ तिचे हे स्पष्टीकरण मान्य न करताच मूळ प्रश्नाच्या झाडाला  पुन्हा लटकणार हे तिला माहीत होतेच आणि शिवाय ते ओढुन ताणुन केलेले स्पष्टीकरण मला पटलेच नव्हते त्यामुळे मी म्हणालो,"अरे वा ताई ,काव्याचे पुस्तक नुसत तुझ्या हाती आले की लगेच तुलाही काव्य सुचू लागले की,पण काही म्हण ताई,या वेळी मला बापूरावांच मतच अधिक बरोबर आहे अस वाटत"
     नेहमीच गणित चुकुन भोपळ्याचा धनी होणाऱ्या मुलाच चुकुन एकाद गणित बरोबर आल्यावर त्याचा चेहरा खुलावा तसाच बापूरावांचा झाला होता, आणि त्याच खुषीत ते म्हणाले,"अरे माझ नेहमीच बरोबर असत पण हिला ते पटायला हव ना" 
"अस का म्हणतोस तू ?" त्यांच्या म्हणण्याची दखल न घेता ताईने विचारले.
" अगं हे वाचून बघ म्हणजे हे काव्य म्हणजे निव्वळ पोपटपंची आहे हे तुला पटेल,पोपटाला आपण काय बोलतो याचा अर्थ जसा माहीत नसतो तसच या कवीच आहे. "म्हणून एक कविता मी वाचून दाखवली
"देखा आनंद आनंद ।शुभ्र शांत मंद मंद ।जशी समईची वात ।तेवे मनमंदीरात ।
आता या चार ओळीतून अर्थ काय निघतो ?"
"आता आणखी हा एक नमुना पहा,
तज्ञ मी अतज्ञ मीहि।गूढ मी अगूढ मी । सुप्त मी असुप्त मीहि।वीर मी अवीर मी।"
"अरे मामा मीही थोडी भर घालू का?"संजूला स्फूर्ती आली आणि तो बडबडू लागला,
"मर्त्य मी अमर्त्य मीहि ।मूर्ख मी अमूर्ख मी ।रंक मी अरंक मीहि।संत मी असंत मी ।
भंग मी अभंग मीहि।संग मी असंग मी ।थांग मी अथांग मीहि ।शांत मी अशांत मी ।"
 "पुरे पुरे त्रस्त समंधा शांत रहा "त्याला थांबवत मी म्हणालो आणि पुस्तकाचे आणखी एक पान उलटून वाचू लागलो.
"कवितेचे नाव आहे र. ग. ल. ऐका बर
"थरथरल ग थरथरल ।मन माझ ग थरथरल ।भरभरल ग भरभरल ।आभाळ ढगानी भरभरल।सरसरल ग सरसरल । पाणी त्यातुन सरसरल ।"
मला मध्येच थांबवून संजू म्हणाला पुढ मी काय म्हणतो ऐका,
"सुरसुरल ग सुरसुरल।नाक सर्दिन सुरसुरल।"
"मग प्रीतीलाही काहीतरी (स्फुर)स्फुरल
"चुरचुरल ग चुरचुरल ।तव्यावर थालपिठ चुरचुरल।फसफसल ग फसफसल।दोश्याच पीठ फसफसल।"
आता सगळ्यानाच जोर आला आणि जणु वृंदगानच सुरु झाले.
" गडगडल ग गडगडल।जिन्यात कुणीतरी गडगडल ।धडधडल ग ।धडधडल । काळिज माझ ।धडधडल ।
"वसवसल ग वसवसल ।माझ्यावर कुणीतरीवसवसल।
"आता थांबा"विंचु चावला या भारुडात हो ऽ म्हणून सगळ्या लोकाना थांबवतात तसे थांबवत मी म्हणालो कारण लोकाना कवितेच्या इंगळीची चांगलीच बाधा झालेली दिसली
"अरे पण यातून काही अर्थ निघतोय का ?" शुद्धीवर असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे बापूराव विचारू लागले,ते बिचारे या काव्यगंगेत गटांगळ्या खात पार बावचाळून गेले होते.
"अहो पण अर्थ निघालाच पाहिजे का?"म्हणत पुढचे पान उलटून मी वाचू लागलो,
"आकाशातिल तारा निखळुन जमिनीवर कोसळल्या।
"जीवनातले रंगरूप लुटुनी लालडल्या ।"
आणखी एक नमुना,"चंद्रावर बैसुनिया।साद घालि प्रेमळशी।कोमल मन भिरभिरले ।गेले ते दाहीदिशी ।"
आणखी हे ऐका,
"प्राजक्ताची पुष्पे नाजुक।परागपूजन मनी बांधुनी।
मेंदी न्हाली रंगुन नटाली।मंजूळ रवे गावी गाणी।"
"थोडक्यात काय आपण लिहीत रहायच"ताईन समारोप करण्याचा प्रयत्न केला."आणि तू अर्थ लावायला आहेसच "मी पुस्ती जोडली आणि बैठक विसर्जित झाली.
             डुसऱ्या दिवशी सक्काळी सक्काळी फोन खणखणला .प्रीती बोलत होती,"मामा अहो मामा"प्रीती एवढ्या जोरात फोनवर बोलत होती की कुठ आग बीग लागली की काय असा भास झालापण पुढचा भाग ऐकल्यावर मात्र खरच आग लागली अस वाञल कारण प्रीती पुढ म्हणाली"अहो मामा,आईनी आज उठल्याउठल्या कविता केलीय""अरे वा ! वा!"उसन अवसान आणून मी म्हणालो.खरतर कालच्या कवितांचा ज्वर अजून उतरला नव्हता पण ताईच्या कवितेतून सुटका नव्हती म्हणून म्हणालो,"बर मग ती ऐकायला येऊ की ती कविता घेऊन इकडेच येतेय?"पण तेवढ्यात फोनवर ताईच नोलू लागली,"अरे ऐकतो आहेस ना?अरे आज सकाळी मजाच झाली"मी जीव मुठीत धरून तची मजा ऐकू लागलो,ती पुढे म्हणाली,"सकाळी लवकर जाग आली आणि खिडकीतून सहज डोकावून पाहिले तर खाली पारिजातकांच्या फुलांचा सडा पडला होता,तो सडा पाहून मला कविता सुचली,दाखवू का वाचून?"मला एक्दम 'सुजाता 'मधील कविता वाचणारा सुनील दत्त आणि ती ऐकत रडणारी नूतन आठवली अर्थात तिच्या रडण्याचे कारण माझ्यापेक्षा वेगळे होते.माझा चेहराही ताईला दिसत नव्हता हे माझे सुदैव !"हं ऐक"ताईन फर्मावल आणि मी काळीज घट्ट करून ऐकू लागलो,
"पंच पंच उष: काली ।जागृति मजला आली।
गवाक्षामधुनी खाली ।बघता मज दिसली।
वृष्टी फुलांची झाली प्राजक्ताच्या खाली।
मनमयूर धुंद होय।नृत्य करी वरखाली।
मन माझ मोहरल ।गंधधुंद भवताली।
ओंजळ पुष्पांची करुनी ।हृदयाजवळी धरली।
वाटे गुज पुष्प्र ही ।गूढ रम्य जणु वदली।
समय थोडका गेला । जीव कामातच रमला ।
दृष्टी खिडकीमधुनी।पुनरपि तेथे गेली।
वृष्टी फुलांची परि तीकोमेजुन गेलेली। 
दिसली मन खिन्न बने।आठवुनी स्थिति पहिली।
क्षणभंगुर सर्व असे जाणिव मजला झाली।"
"वा वा" मी दाद दिली .कविता अगदीच टाकाऊ नव्हती.तशा अर्थाची एक कविता पूर्वी वाचल्यासारखे वाटत होत पण एकसारख्या कल्पना दोन व्यक्तीना सुचू नये असे थोडेच आहे.
"मग काय आता दररोज एक कविता आणि एका महिन्यात मंदाकिले का ?"ताईच्या मंदाकिनी नावावर रल्हादले चा संदर्भ घेऊन कोटी करत मी म्हणालो.
"छे रे तू काय मला बर्दापूरकर समजलास की काय?"फोन बंद करत ती म्हणाली>
       दुसऱ्या दिवशी सकाळी ताईच फिरून येताना माझ्याकडे डोकावली,वाटले आजही कविता आणली असावी पण हातात कागद दिसत नव्हता की वही नव्हती.मी म्हटल सावरकरांप्रमाणे ताई कविता तयार करून लगेच पाठही करून टाकते की काय ?
"काय आज कोणती कविता?"मी उत्साहाने विचारले कारण आज बऱ्याच मोठ्या मानसिक तयारीन मी बसलो होतो,पण तिन माझी एकदम निराशा केली,आणि तिचे उत्तर ऐकून तर मी अवाकच झालो
"आज कविता नाही आणि कधीही नाही,काल केलेलीसुद्धा फाडून फेकून दिली"
"पण अस काय झाल एकदम?"मी आश्चर्यान विचारल.
"झाल काहीच नाही पण मलाच पटली नाही ती टला ट रीला री ची कसरत.उगीचच आली गेली उठली बसली करून काय कविता होत ?"
"पण कालची तुझी कविता पहिलाच प्रयत्न या दृष्टीने चांगली होती,तुझ्यात कवयित्रीचे सुप्त गुण आहेत"मी तिचा उत्साह वाढवण्यासाठी म्हणालो .
"ती तुझी समजूत बदलायला नको म्हणूनच मी कविता करण थांबवल!तो कविता कशाला करतेस यापेक्षा तू कविता का करत नाहीस अस कुणी विचारलेल मला बर वाटेल"
मी मात्र ताईच्याइतका समजूतदारपणा बर्दापूरकर आणि त्यांच्या समानशीलांमध्ये येवो अशी देवापाशी प्रार्थना करायचा मनोमनी निश्चय केला.

टीप:अशा प्रकारचे कवितासंग्रह खरोखरच आहेत‌ शिष्टतेचा भंग होऊ नये म्हणून कवी आणि कवितासंग्रहांची नावे उघड केली नाहीत.ताईची कविता तिने फाडून फेकून दिल्यामुळे माझ्या लक्षात राहिली तशी उद्द्गृत केली आहे.