माझ्या वडिलांनी म्हातारपणावर कविता केली आहे. त्यांचे वय ८९ आहे. त्यांच्या परवानगीने ती पाठवत आहे.
दीर्घायुषी भव काय तर म्हणे दीर्घायुषी भव
ते दुखरंखुपरं म्हातारपण कशाला हो हवं
ठीकठाक असलात तरी असुन असुन किती
केंव्हा काय होईल याची असणारच की भीति
मोडकेतोडके असाल तर काही विचारुच नका
अहो, औषधपाण्याचा खर्च काही कमी येतो का
बरं, अगदी स्वावलंबी असलात तरी ते पैशापुरतं
बाकीची तुमची देखभाल दुसरंच ना कोणी करतं
समंजस सुना मुलं तसं दर्शवणार सुद्धा नाहीत
पण त्यांच्या मनांत काहीच येत नसेल, कुणाला माहीत
शिवाय ती लुडबुड, ते वेंधळेपण अन ते विस्मरण
कटकटच की, बरं असं बोलावून थोडंच येताय ते मरण ?
स्वतःच्या मरणाबद्दल जे बोलतात त्यांना आपलं कौतुक हवं असतं
त्याबद्दल इतरांना काय वाटतं ते आजमवायचं असतं
पण असं कोणी तोंडावर सांगेल का माणुसकी सोडून
की तुमची गैरहजेरी आता चालण्यासारखी आहे म्हणून
अहो एवढे वृद्धाश्रम निघताहेत त्याचा अर्थच काय होतो ?
आपल्या बायकोमुलांचं सुख पहाणारच की जो तो
अन मी म्हणतो की त्यांत वावगं तरी काय आहे एवढं
वृद्धांनीच नको का समजून घ्यायला, निदान जमेल तेवढं
मुलांच्या करताच (जणु काही) एवढे काबाडकष्ट केल्यावर
विश्रांति ही हवीच की शेवटी दमल्या भागल्यावर
पण म्हणे, हक्कानेच करुन घ्यावं आपलं पालनपोषण व रक्षण
छे छे, असं वसुली करणं हे काय सुसंस्कृतपणाचं लक्षण ?
आपण सुध्दा तरुण होतो याची वृद्धांनी आठवण ठेवावी व
आपण सुद्धा म्हातारे होणार ही जाणीव तरुणांनी बाळगावी
एवढं जरी केलं तरी ताणतणाव थोडासा होईलच की कमी
निदान पेनकिलर घेतल्याइतपत तरी नक्की येईल कामी
ताणतणावाचा काळ फार लांबला तर सारंच प्रेम आटतं
पावसाळा संपायला उशीर झाला तर आपल्याला कसं वाटतं
तसेच जर धडधाकट असाल, अगदी काम करण्याइतके
तर जगा की मग खुशाल आणि मजेत पाहिजे तितके
अमेरिकेत म्हणे माणसं खूप वर्ष तंदुरुस्तीने जगतात
ऐंशी ऐंशी वयापर्यंत तिथे भरपूर कामही करतात
शिवाय श्रीमंत तो देश त्यांना कायहो कमी !
आपल्याकडे सर्वच घोटाळा, मग कशाची देणार हमी ?
पुढारी, राजकारणी आणि गुंड आपलं शोषण करतात
अन सत्ताधारी पण चक्क त्यांना सांभाळून घेतात
लोकसंख्या, महागाई आणि भ्रष्टाचार यापुढे वाढतच जाणार
मग माणुसकीला तिथे कुठली जागा रहाणार ?
स्वेच्छामरणाचा कायदा करण्यात खरं कसलं आलंय पातक ?
पण माणुसकी हरवलेल्या देशात तो सुद्धा ठरेल घातक
सहा कोटी वृद्ध, त्यांच्या गरजांत कपात करता येईल?
त्यापेक्षा ते कमीतकमी असतील तर केवढी बचत होईल
एकेकाळी होतंच की आपलं सरासरी आयुष्यमान
साठ ते पासष्ट, अन तेंव्हाच होतो आपण खरे भाग्यवान
पंचावनला निवृत्ती, मग पुढे पांच दहा वर्ष आराम
नंतर सगळ्यालाच ठोकायचा कायमचा रामराम !!