स्वप्न

जवळ माझ्या निजून पण
तू माझ्या स्वप्नात आलास
आणि मनातल्या इच्छा
तू व्यक्त करून गेलास

म्हणालास आज आपल्यासाठी जगू
जबाबदार्‍या झटकून टाकू
त्यांनाच उराशी बाळगले
आपले जीवन नाही जगले

तुझ्या माझ्या भावनांची
आज विचारपूस करू
आजवर त्यांना दाबले होते
आज त्यांना मोकळे करू

आज एकमेकांसाठी भेटी देऊ
आजवर बाजारहाट किराणा भरले
मान पान सावरले
आज आपल्यासाठी खर्चू

आज आपण निसर्गात हिंडू
डोंगर, नदी, समुद्र, तलाव पाहू
आजच्या दिवस नको राणी तू
हातावर चटके झेलू

चल सखे आज आपण
प्रेम काय असत ते पाहू
आपल्याच विश्वात
आज आपण हरवून जाऊ

धुंद स्वप्नामध्ये रात्र लागली
हळू हळू मावळू
हे स्वप्न तुझ्या की माझ्या मनीचे
हा विचार कसा आवरू?

प्राजक्ता.