हे मिथक आहे का, भीमा ?

एकही पान नाही फांदीवर
हा देह असा निषर्प्ण धुवांधार
संपूर्ण गच्च
सळसळणारा...

अतीताच्या काळ्याभोर पावसानं
झोडपून काढलं मला
उभं-आडवं
हिंस्त्र;
काही तरी मागू पाहणाऱ्या
बोटांवर
ओठांवर
दिले डाग
प्रखर
चरचरीत
चंद्र संपून गेला
माझ्यापर्यंत येईस्तोवर !
क्षीण
धुगधुगत
मरतुकडा
पाश म्हणाला होता,
'सब से खतरनाक होता है
हमारे सपनो का मर जाना!'

हे मिथक आहे का
की, मी उच्चार करते तुझ्या
नावाचा
आणि उमलून  येतात टचकन
असंख्य कमळं आरस्पांनी त्वचेची
हे मिथक आहे का
की, मी उच्चार करते तुझ्या
नावाचा
आणि इतिहास जिवंत होतो
रक्ताळलेल्या रजोअस्तरासारखा
ग्लोबल तिठ्यावर
आज्जी विकत बसलीये
विळी न कोयता
भाऱ्यावर भारे गवताचे
जिभेची छिन्नी
न भाषेचे हत्यार तेजतर्रार

केवढी मोठी भूक तिची
न कधीची लागलीये तहान तिला
भाकरीसाठी लाचार
नाही पाहिलं मी कधीच तिला

तिला माणूस व्हायचं होत !
प्रत्येक युद्धात
प्रत्येक शिरकाणात
प्रत्येक दंग्यात
हिंस्त्रेच्या प्रच्छन्न अराजकात
खैरलांजीत
खैरलांजीनंतरही !!

धाय मोकलून रडते मी
अख्खं घर रडलं गदगदून
वस्तूंनाही फुटला पाझर…..
हुंदके आवरेनात
म्हणून भिंतीत तोंड खुपसलं
अ-वस्तूंनी

तेव्हाही रडतच होते मी
शंभर वर्षापूर्वी
हजार वर्षापूर्वी देखील
रडतच होते मी
युगानुयुगे रडतेच आहे मी
का रडतेय मी अशी?

मला नाही वाटत पडल्यानंतरही
मोकळं
ऍरिस्टॉटल म्हणाला कसं
नाही होत माझं
कॅथार्सिस!
आणखी किती बघायच्या
शोकांतिका ?
दिसत नाही मला एकही
विश्वात्मक विधान !
मला दिसतो प्रियांका भोतमांगेचा
छाटलेला स्तन कोवळा
तिच्या गुप्तांगात खुपसलेल्या
काठ्या
मायलेकींवर आळीपाळीनं
निर्घृण बलात्कार करणाऱ्या
आपल्याच
नवऱ्याला भावाला बापाला
मुलाला चुलत्याला पुतण्याला
टाळ्या वाजवून प्रोत्साहन देणाऱ्या
खैरलांजीतल्या आयाबहिणी !!!

हा भगिनी-भावाचा (!) ताशा
तडामतड वाजणारा
हा मंत्रालयाचा सुस्त मजला सहावा
अचंबीत झालेला
या तुझ्याच लेकी भीमा
वाघीणीगत चवताळून  उठलेल्या

मला शरम वाटते
बलात्काराला जात नसते
म्हणणाऱ्यांची
मला कीव वाटते
भावाला बहिणीशी संभोग करायला
लावणाऱ्या
यमयमीच्या विकृत वारसदारांची
जातवास्तव
वर्गवास्तव
लिंगभेदवास्तव
पोतराज
ओढतोय
कर्मविपाकाचा दर्दनाक आसूड
स्वतःच्याच अवयवांवर
'पैसा फेको तमाशा देखो
बच्चे लोग बजाव
तालीयाँ बजाव'
हा सुबत्तेचा ग्लोबल फुफाटा
उडतोय
भैयालाल भोतमांगेच्या ठार दगड
झालेल्या डोळ्यात

आत्ता कुठं गळून पडू लागली होती
अभावाची खपली
आत्ता कुठं उलगडू लागलं होतं
अंधाराचं प्राचीन कोडं
आत्ता कुठं येऊ लागला होता
शांततेला
शांत आवाज

वाटलं होतं
भूतकाळानंही आता टाकलीय गड्या
जीर्ण शीर्ण कात
नि हा जुना हुंदका
किती तरी युगांचा
गिळून टाकला आम्ही
विषाचा प्याला समजून

तरी पडतच राहिलं
भ्रमनिरसाचं भयंकर स्वप्न
पुन्हा कितव्यांदा तरी
दिवसाढवळ्या
रात्री-अपरात्री
कुठल्याही हंगामात
कुठल्याही  ॠतूत
कॅलेंडर फडफडत राहीलं
फक्त
मागं पुढं पुढं मागं
या देशानं हरवली मूळ माणसं
तरी देशाला हरवून बसलो नाही
आम्ही
इतकं करंट होऊ दिलं नाहीस तू
आम्हाला
हे तूच दिलेलं द्रष्टेपण
की, आम्ही अजून घेतला नाही
एकही ग्रेनेड बॉम्ब हातात
हे तूच दिलेलं द्रष्टेपण
की, आम्ही चिरायू ठेवलं
करूणेचं सार्वभौमत्व !

आम्ही नाही उडवली आकाशात
शांततेची कबुतरं !
तेवढी चैन नव्हती आमच्याजवळ
अस्तित्वाच्या तीव्र लढ्यात
तरी आम्ही म्हणत राहिलो
बेंबीच्या देठापासून
जगा, जगू द्या, जगवा
अत्यंत निर्व्याजपणे

अत्यंत निर्व्याजपणे प्रेम घडत
राहीलं भर खैरलांजीत

हा पांढराशुभ्र ढग चाललाय ना
अल्लाद
त्याच्यावरच नेऊन बसवतो तो
मला
जिवलगाचे डोळे आहेत
संपूर्ण नागडे
कुणीही बघू शकतं त्याच्या
डोळ्यात थेट
प्रेम
आणी
खैरलांजी

नवऱ्याकडे परत जा
नवऱ्याकडे !
खूप आवाज आले
समाजमान्य सुरक्षित छपरातून
उदात्त

मी नाकारते कुणाचीही वस्तू बनणं
मी नाकारते कुणालाही वस्तू
बनवणं

बाई हसू शकते का
मन मेंदू गर्भाशयासकट, खळाळतं
मुक्त निर्भर !
एकदा विचरलं पाहीजे सुरेखा
भोतमांगेला
जाहीर
भर चौकात

किती दूरय अजून
जातिअंताचा लढा......
किती दूरय अजून
रांगेत
उभा असलेला शेवटचा माणूस
किती दूरय अजून
रांगेत उभंच नसलेलं बाईमाणूस

तूर्तास
आम्ही उतरलो आहोत
विद्रोहाची जुनीच परिमाणं घेऊन
कुचकामी.....

'मोहब्बत मे नही है फर्क
जिने और मरने का!'
जग बदलण्याच्या अटळ संघर्षात
जगण्या-मरण्यातलं अंतर कधी
पुसलं जाईल भिमा ??

-प्रज्ञा लोखंडे
(’लव्ह इन द टाईम ऑफ खैरलांजी’ या दिर्घकवितेतील अंश)