कवी विनायक जनार्दन करंदीकर (१८७२-१९०९ )यांची महाराष्ट्र लक्ष्मी ही कविता मनोगतावर देत आहे.
महाराष्ट्रलक्ष्मी
महाराष्ट्र-लक्ष्मी माते जगी धन्य वाटे,
यशोगीत तीचे गाता मनी हर्ष वाटे.
पुन: पुन्हा परचक्राने ताडिली बिचारी,
दिर्घकाल खचली होती पारतंत्र्यभारी,
द्वादशब्द दुष्काळाने जाहली भिकारी,
संकटात तीच म्हणोनी करी उंच माथे.
मावळात वास ,न ठावे जया बाह्य वारे ,
नेमेधर्म ज्यांचे लोकी कृषीकर्म सारे,
विळा कोयतीच जयांची काय ती हत्यारे,
तेच विर बनले समयी मावळे मराठे.
नये नीट धरिता ज्याला लेखणी करांनी,
कृपादृष्टि संपत्तीची न ज्याचे ठिकाणी ,
परी यवन सत्तेची जो करी धूळधाणी,
कोण तया शिवरायाच्या पावल यशाते ?
साधुसंत झाले,असती,तयांची न वाण ,
मात्र रामदासा लाधे समर्थाभिधान,
जो मनी स्वदेशहिताचे धरोनी निशाण
ध्वजा कौपिनाची मिरवी भारतात थाटे .
कढीभातखाऊ म्हणती ब्राम्हणा जगात ,
ढीली कास ज्यांची म्हणुनी हासती,हसोत ,
तयांनीच करणी केली केली प्रसंगी अचाट ,
खोल गढे परसत्ता ती ढासळली लाथे.
पुर्व दिव्य ज्यांचे ,त्यांना रम्य भविष्यकाळ ,
बोध हाच इतिहासाचा सदा सर्वकाळ,
कासया वहावी चिंता मनी मग जहाल,
रात्र सरे तेव्हा उगवे दिनहि पूर्ववाटे .
महाराष्ट्रलक्ष्मी- महाराष्ट्रलक्ष्मीचे हे भावपूर्ण गौरवगीत आहे .गोविंदाग्रज व श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी नंतरच्या काळात लिहीलेल्या 'महाराष्ट्रगीताचे'बीज या कवितेत सापडते . शेवटच्या कडव्यातील तत्त्वविचार मराठीत शुभाषितांप्तमाणे स्थिररुप पावला आहे. त्यातला देशाबिमानाचा आवेग प्रभावी आहे . (ही कविता -काव्यगंगा.-संपा.कुलकर्णी, भिमराव .पुणे: अनमोल प्रकाशन .यातून )