प्र.: आता थोड्या कठोर प्रश्नाकडे वळतो...
प्रेक्षकांच्या एका मोठ्या वर्गाला आजकाल मराठी वाहिन्यांवर चाललेल्या मालिका अवास्तव वाटतात. या वर्गात मीही मोडतो. दैनंदिन जीवनात ज्या कधीही पाहायला मिळत नाहीत, अशा गोष्टी ह्या ग्लॉसी मालिका दाखवतात. उदाहरणार्थ, एखादे स्त्रीपात्र झोपेतून उठते तेव्हा ती पूर्ण मेकप केलेली असते, तिचे केस जराही विस्कटलेले नसतात. मालिकेतली पुरुषपात्रे घरातही सुटा-बुटात वावरतात. स्त्रीपात्रांचे नऊ महिने भरले तरी त्या अगदी उड्या मारत चालू शकतात. प्रत्येक नायिका भयंकर त्यागमूर्ती असते तर प्रत्येक खलनायिका चेटकिणीची बहीण शोभते. कोणतेही पात्र कधीही कोमात जाते, प्लास्टिक सर्जरी करून स्वतःला बदलते. आणि या सगळ्यात तोच तो बटबटीतपणा. मालिकांचा वास्तवाशी निदान थोडातरी संबंध असावा एवढीच आमची रास्त अपेक्षा. ही एक बाब.
दुसरी बाब म्हणजे मालिकांच्या भडकपणाचा समाजावरच काही वाईट परिणाम होण्याची शक्यता वाटत रहाते.उदाहरणार्थ, लहान मुलं हट्टीपणा करताना मोठमोठ्याने किंचाळतात - हा मालिका पहाण्याचा परिणाम आहे का? माझ्या लहान मुलीने विचारले, "बाबा, या सगळ्या काकू अशाच दुष्ट असतात का हो?" हा जो बालमनावर परिणाम होतो आहे तो या प्रकारच्या मालिकांमुळे होत आहे काय? आणि या प्रकारच्या मालिकाच दिवसातला महत्त्वाचा वेळ म्हणजे प्राइम टाइम गिळंकृत करून बसलेल्या आहेत. त्या बदलणार तरी कशा? खऱ्याच चांगल्या मालिका किंवा कार्यक्रम मात्र अगदी गैरसोयीच्या वेळी दाखवले जातात.उदाहरणार्थ, मला सर्वात आवडणारा 'संवाद' हा कार्यक्रम मध्यरात्री असतो.
'गजरा', 'गोट्या' यासारखे उत्कृष्ट कार्यक्रम- आताची निर्मितिमूल्यं - उत्कृष्ट सेट, कॅमेरे, कलाकार, दिग्दर्शक घेऊन कधी होणारच नाहीत का? का टीआरपी भरपूर आहे म्हणून लोकांना 'सासू-सून 'छाप मालिकाच जन्मभर पाहत बसावं लागणार? तसे चांगले कार्यक्रम देण्याचा प्रयत्न तरी तुम्ही करून बघणार नाही का?
तर, आता हा जो प्रश्नांचा भडीमार आहे त्याला तुमच्याकडे काय उत्तर आहे?
उ.: (हसतात.)आता ही जी तुमची टीका, टिप्पणी आहे ना ती 'खरी' आहे. 'योग्य' आहे असं मी म्हणणार नाही. पण 'खरी' नक्कीच आहे.आणि जसं तुम्ही म्हणाला तसं हे सगळं टीआरपी वर अवलंबून असलेलं गणित आहे. टीआरपी चे जे आकडे असतात त्यावर चॅनलचं पूर्ण अस्तित्व अवलंबून असतं.
जर तुमचं टीआरपी रेटिंग नसेल तर तुम्हाला जाहिराती मिळत नाहीत आणि संपूर्ण वाहिनीचं अस्तित्वच धोक्यात येतं हे कठोर वास्तव आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की चर्चा करताना, बोलताना मालिकाविषयी जास्त बोललं जातं. बाकीच्या कार्यक्रमांकडे थोडसं दुर्लक्ष होत असावं. याचं कारण म्हणजे मालिका प्राइम टाइम मध्ये असतात. प्राइम टाइम हा काळ असा आहे की ज्यामध्ये सर्वात जास्त प्रेक्षक वर्ग उपस्थित असतो. त्यामुळे मुख्य टीआरपी हा प्राइम टाइम मध्येच येतो जो बाकीच्या सगळ्या नॉन-प्राइम टाइमच्या कार्यक्रमांना आधार देत असतो.त्यामुळे प्राइम-टाइमचा टीआरपी क्षीण असेल तर बाकीचे कार्यक्रम दाखवण्यासाठी तुमची वाहिनीच अस्तित्वात रहाणार नाही.
वाहिनीचं संपूर्ण आर्थिक गणितच कोलमडून पडेल. हा सगळा डोलारा कोसळून पडेल. त्यामुळे प्राइम टाइममध्ये टीआरपी देणारे कार्यक्रमच टाकावे लागतात. जर 'संवाद'सारखा कार्यक्रम प्राइम-टाइममध्ये टाकला तर अर्थातच त्याला टीआरपी येणार नाही. कारण तो एका 'नीश ऑडियन्स'साठी म्हणून कार्यक्रम आहे.प्राईम-टाईममध्ये असलेले कार्यक्रम हे 'मास ऑडियन्स'साठी असलेले प्रोग्राम्स असतात.
तुम्ही म्हटल्यासारख्या प्रतिक्रिया आमच्याकडे येत असतात. पण त्या काही विशिष्ट वर्गाकडून येत असतात - पत्रानं, ईमेलनं. आम्हीही प्रेक्षकांना भेटतो, बोलतो. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो. पण टीआरपी हे एकमेव परिमाण असं आहे ज्यामुळे किती लोक तुमचा कार्यक्रम सातत्यानं पहातात याचा अंदाज लागू शकतो.आणि तेवढंच नाही तर त्याच्यामध्ये सगळी विभागवार माहिती मिळू शकते. म्हणजे किती पुरुष आहेत, किती महिला आहेत, कोणत्या वयोगटातली आहेत - अगदी मिनिटामिनिटाचीही माहिती मिळू शकते की मालिका जर साडे आठला सुरू झाली आणि नऊ वाजता संपली तर आठ वाजून बत्तीस मिनिटांनी किती प्रेक्षक होते?, आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी किती होते?, आठ त्रेपन्नला किती होते?- त्याची माहिती मिळते. त्या माहितीची अनेक पर्म्युटेशन-कॉम्बिनेशन करून त्याचा अभ्यास केला जातो. त्यातून त्या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांचा आराखडा त्यातून लक्षात येतो. मग जर दोन कोटी लोकांपर्यंत तुमची वाहिनी पोचू शकते आणि त्यातले दहा लाख प्रेक्षक एखादा कार्यक्रम सातत्यानं बघतायत- कारण त्यांना त्यातलं काहीतरी पटतंय, रुचतंय, आवडतंय आणि त्यातली कुणीतरी शंभर माणसं असं म्हणतात की नाही, ही मालिका खूपच वाईट आहे, तर मग दहा लाख लोकांचं मत त्या शंभर लोकांच्या मतासाठी डावलायचं का?
प्र. : पण टीआरपी गोळा करण्याची पद्धतच सदोष असण्याची शक्यता नाकारता येईल का?
उ.: अं...सदोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तीच एक आंतरराष्ट्रीय मान्यता पावलेली...
प्र.: कारण..ही टीआरपी गोळा करणारी जी यंत्रं असतात ती फक्त पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरातल्या घरात लावलेली असतात. ती दुर्गम भागात म्हणजे तळ कोकणात किंवा मराठवाड्यातल्या एखाद्या खेड्यात लावलेली नसतात.आणि अशा ठिकाणचे प्रेक्षक नक्की काय बघतात हे कसं कळू शकेल?
उ.: भारतामध्ये 'टॅम' या संस्थेद्वारे रेटिंग दिले जातात - सर्व वाहिन्यांकडे हा विदा(डेटा) येतो. आणि त्यावर विश्वास ठेवूनच भारतात हजारो कोटी रुपये किंमतीच्या जाहिराती दिल्या जातात. त्यामुळे ते रेटिंग चुकीचं आहे, त्याची पद्धत सदोष आहे वगैरे शंका उपस्थित करणं हे फारसं योग्य ठरणार नाही. कारण ते एकक सर्वमान्य आहे आणि बिनचूक आहे हे आपण गृहीत धरून चालतो.
आता मी तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो - 'चार दिवस सासूचे' किंवा 'गोजिरवाण्या घरात' या मालिकांचं रेटिंग खूप चांगलं आहे. पण सडकून टीकापण होते. त्याच्या उलट 'सोनियाचा उंबरा' सारखी मालिका आहे. त्याच्यावर अजिबात टीका होत नाही. कौतुकाचा वर्षाव होतो.सर्व अवॉर्ड मिळतात.पण टीआरपी मिळत नाही.... तरीसुद्धा आम्ही अशा प्रकारच्या मालिका - सोनियाच्या उंबरासारखी सिरियल केलेली आहे आणि यापुढेही करत राहू - एक वाहिनीच्या दृष्टीकोनासाठी आणि काही विशिष्ट प्रेक्षकवर्ग आहे त्यांना त्या आवडतात म्हणून.
प्र.: ज्यावेळी एखाद्या मालिकेला टीआरपी रेटिंग येत नाही त्यावेळी तुम्ही ती रेटिंग मिळवणारी तत्त्वं (एलेमेंट्स्) त्यात घुसवता का?
उ.: करतो ना तसं. टी.व्ही. मालिका बनवणं इज नॉट अ जोक! म्हणजे आज आपण म्हणताना म्हणतो की इतका लाऊड अभिनय का करतात?, किंवा संगीत इतकं लाऊड का आहे?, किंवा मघाशी तुमचे जे जे मुद्दे होते - झोपेतून उठलं तरी साडी अशीच का दिसते? पण तुम्हाला खरं सांगू? झोपेतून उठलेली बाई आणि ती आळसावलेल्या चेहऱ्याची असेल तर ते बघायलाही बरं वाटत नाही. खरंच वाटत नाही.(हासत...) वास्तववादी वाटेल पण टेलिव्हिजनवरती कार्यक्रमात पाहताना ते चांगलं वाटणार नाही. तसं करून पाहिलं तर ते पाहणाऱ्याला नक्कीच खटकणार. कारण ती फक्त त्या सीनची सुरुवात असते. ती व्यक्ती झोपेतून उठली आहे. त्याच्या पुढे एक मोठा प्रसंग असतो.त्या प्रसंगात काहीतरी नाट्यमय घडणार असते. तुम्ही पूर्ण प्रसंगभर त्या पात्राला विस्कटलेले केस, अस्ताव्यस्त कपडे अशा अवतारात दोन-तीन-चार मिनिटांपेक्षा फार काळ पाहू शकणार नाही.हे काय चाललंय?साधी सीरीयलसुद्धा बनवता येत नाही, अशी टीका होईल.
प्र.: आणि अनेक मालिकांच्या कथांमधे येणाऱ्या त्याचत्याचपणाविषयी काय म्हणाल?
उ.: ते खरं आहे. मालिकांच्या कथानकांत तोचतोचपणा येतो. कारण एखादी मालिका यशस्वी झाली... आणि ते चित्रपटातसुद्धा आहे. कारण यशाचा हमखास फॉर्म्युला तसा कुणालाच माहिती नाही.त्यामुळे प्रत्येकजण चाचपडत अंदाज बांधतो - की हे केलं तर ही मालिका लोकांना आवडते, यशस्वी होते, चांगला टीआरपी मिळतो. मग अशा प्रयत्नांतून हा तोचतोचपणा येतो.
प्र.: पण अगदी पात्रांची नावंदेखील तीच असण्याइतपत सारखेपणा आला तर लोकांना आपण कोणती सिरियल बघतोय तेच कळणार नाही.
उ.: तुम्ही ई-टीव्ही मराठी बद्दल बोलताय?
प्र.: हो. ई-टीव्ही मराठीवरच! हे तुम्हाला खटकतं का?
उ.: मला वाटतं तुम्ही 'साता जन्माच्या गाठी' आणि 'काटा रुते कुणाला' बद्दल बोलताय.
प्र.: हो..हो..कुणाल... कुणाल...आणि त्या दोन्ही व्यक्तिरेखांचे रंगही जवळपास सारखे आहेत.
उ.: बरोबर.. बरोबर... खटकतं ना! पण ते बदलणं शक्य होत नाही हो. आपण एका व्यक्तीला कुणाल म्हटल्यावर उद्या त्याचं नाव आपल्याला बदलता येत नाही.
प्र.: तुम्हाला असं वाटतं का की हे एक दुष्टचक्र आहे? लोकांना तशा मालिका बघून-बघून त्या आवडायला लागल्या, त्यांची मानसिकताच तशी झाली आणि मग त्याचप्रकारच्या मालिकांना अधिक रेटिंग मिळू लागलं, मग पुन्हा तशाच मालिका बनत राहिल्या... असं काहीसं आहे का?
कदाचित अशा सवंग, बटबटीत,भडक मालिका बघून भारतातल्या लोकांची मानसिकता- कलादृष्टी उथळ बनत चालली आहे का? भारतात टीव्हीवर कसदार कलाकृतींना वावच मिळणार नाही का?
उ.: नाही, मला वाटत नाही असं होईल.हा सगळा प्रकार चित्रपटातसुद्धा होतो, संगीतातसुद्धा होतो. आणि मला असं वाटतं की विशेषत: मालिकांच्या बाबतीत तर प्रेक्षक तेवढ्या अर्ध्या तासापुरती ती मालिका पाहून निकटवर्तीयांबरोबर कदाचित चर्चा वगैरे करत असतील. पण त्याच्यापुढे त्याचा काही परिणाम वगैरे होत असेल असं मला वाटत नाही.कारण प्रेक्षक तेवढे सुजाण असतात - हे पडद्यावर जे चालू आहे ते काल्पनिक आहे, रंजित आहे, कदाचित अतिरंजित आहे...हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर त्याचा काही परिणाम होत नसावा.
प्र.: आता पुढच्या मुद्द्याकडे वळू... ई-टीव्ही मराठीचं पे-चॅनल झाल्यावर त्याचा काही परिणाम झाला का?
उ.: अरे बापरे, खूपच परिणाम झाला.तो फार मोठा निर्णय होता. जवळपास पुनर्जन्म झाल्यासारखी परिस्थिती होती चॅनेलसाठी. मी स्वतः तीन महिने झोपलो नाही असं म्हटलं तरी चालेल...(हसतात) इतकं मानसिक दडपण होतं. खूप ताण पडला या सगळया प्रक्रियेतून जाताना. पण अर्थात तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता.आणि कधी ना कधी ते करायचंच होतं. खरंतर उशीरच झाला होता. पे-चॅनेल झाल्यावर टीआरपी खूपच कमी झाले होते. अगदी तळच गाठला होता.अगदी नवीन वाहिनीसुद्धा मोठी वाटेल अशी परिस्थिती आली होती. पण सुदैवानं गेल्या सात वर्षांची पुण्याई ई-टीव्ही मराठीच्या पाठीशी आहे. त्यामुळे फक्त चारच महिन्यात चॅनलची परिस्थिती पूर्वपदावर आली आहे, असं म्हणायला हरकत नाही. जवळपास प्री-एन्क्रिप्शनची परिस्थिती आली आहे. याचं कारणच हे आहे की प्रेक्षकांचा पाठिंबा अनेक वर्षांपासून जो मिळालेला आहे, जो विश्वास प्रेक्षकांनी ई-टीव्हीवर दाखवलेला आहे त्यामुळेच चॅनल परत हळूहळू दिसू लागल्यावर पुन्हा टीआरपी पूर्वीच्या स्थितीत येत आहेत. ही प्रेक्षकांची आत्मीयताच ई-टीव्हीला पुढे घेऊन जाईल आणि प्रेक्षकाभिमुख कार्यक्रम करण्याची जी आमची विचारधारा आहे तिला पूरक ठरेल.
प्र.: सध्या मराठी न्यूज चॅनलची लाट आहे. स्टार माझा,आयबीएन वगैरे वाहिन्या मराठी बातम्यांसाठी खास निर्माण होत आहेत. तसंच २४ तास मराठी चित्रपट दाखवणारं झी-टॉकीज आलेलं आहे. ई-टीव्ही नेटवर्क असा काही विचार करत आहे का?
उ.: बातम्यांच्या वाहिनीची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. म्हणजे या सगळ्या बातम्या वाहिन्या सुरू होण्याअगोदरपासून ही चर्चा सुरू आहे. पण त्यावर अंतिम निर्णय अजून झालेला नाही. अजून फक्त प्रस्ताव विचाराधीन आहे, एवढंच. चित्रपट वाहिनीचा विचार मात्र सध्यातरी नाही. आमच्या वाहिनीचं स्वरूपच पहिल्यापासून बातम्या, मनोरंजक कार्यक्रम, चित्रपट, माहितीप्रद कार्यक्रम देणारी वाहिनी असं आहे. सर्वकाही एकाच वाहिनीवर - एखादी महत्त्वाची बातमी कळली तर आम्ही मनोरंजक कार्यक्रम थांबवून ती देतो. मुंबईत लोकलमध्ये झालेल्या बाँबस्फोटांची बातमी आम्ही 'चार दिवस सासूचे' सारखा लोकप्रिय कार्यक्रम थांबवून दिली होती. फ्लॅश तर करू शकतोच.सध्यातरी वाहिनीचं असं संमिश्र स्वरूप ठेवायचंच धोरण आहे.
प्र.: ई-टीव्ही मराठी इंटरनेटवर देण्याचा विचार आहे का?
उ.: सध्यातरी इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचा विचार नाहीये. पण नुकतंच मोबाईलवर उपलब्ध झालं. 'आयडिआ'वर हळुहळू परिस्थिती खूप बदलत आहे. एकंदरच मीडिया इतक्या वेगाने प्रगती करतो आहे की रोज यात काही-ना-काही घडामोडी होत असतात.आजपासून पुढच्या दोन वर्षांमध्ये टीव्हीची परिस्थिती कशी असेल हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. पण अजूनही नक्की नाही.आजचे टीआरपी सारखे परिमाणसुद्धा पूर्णपणे बदलून जाऊ शकेल.फार लांब नाही.फक्त दोन वर्षात - आयपी टीव्ही, डीटीएच, मोबाईल यांचा प्रेक्षकवर्ग त्यात मिसळला तर हे सारं चित्र खूपच बदलून जाईल.सध्या टीआरपी मध्ये फक्त 'सॅटेलाईट आणि केबल' याच प्रेक्षकांचा समावेश होतो. नव्या प्रेक्षक वर्गामुळे प्रोग्रॅमिंगचे स्वरूपही बदलण्याची शक्यता आहे.
प्र.: ई-टीव्ही मराठीच्या काय नव्या योजना आहेत?त्याचं भवितव्य काय असेल?
उ.:भवितव्य चांगलंच आहे. म्हणजे नव्या वाहिन्या येतील,प्रेक्षक वर्ग विभागला जाईल. पण आमच्या दर्जात असलेल्या सातत्यामुळं हे चॅनल स्पर्धेत टिकून राहील नव्हे तर बाजी मारेल.
प्र.: तुमच्या वैयक्तिक काय योजना आहेत? चित्रपट करणार काय? नवीन काही करायची संधी मिळताच तुम्ही तिकडे वळाल काय?
उ.: आहेत ना. नवी अनेक आव्हानात्मक क्षेत्र येतायत. पण अजून विचार केलेला नाही. सध्यातरी ई-टीव्ही मराठी परत पूर्वीच्या जोमाने उभे करायचे आणि त्याला पुढे न्यायचेच आव्हान डोळ्यासमोर आहे. तेच ध्येय आहे.
प्र. पण तुमचं पहिलं प्रेम म्हणजे चित्रपट...
उ.: गेल्या दोन वर्षात टीव्ही हे माध्यम मला चित्रपटापेक्षाही जास्त आव्हानात्मक वाटायला लागलंय. इथे चित्रपटाचं- मालिकेचं दिग्दर्शन करण्याइतकं मर्यादित काम नाही. प्रोग्रॅमिंगचं काम फारच आव्हानात्मक आहे. ते काम अंगावर येतं. सध्यातरी तेच मला जास्त खुणावतंय.
प्र.: पण चित्रपट केलाच तर हिंदी कराल की मराठी?
उ. आता केलाच तर मराठीत करायला आवडेल. कारण ती माझी मातृभाषा आहे. आणि मराठी प्रेक्षकांच्या आवडीनिवडी मला बऱ्यापैकी कळतात असं म्हणता येईल. त्यामुळं मराठीतच करायला आवडेल.
आपल्या या पुढील वाटचालीला मनोगत आणि मनोगतींतर्फे अनेक शुभेच्छा.आणि मुलाखतीला भरपूर वेळ दिलात त्याबद्दल मनापासून आभार...
उ.: आभार..मनोगतींना माझा नमस्कार आणि दिवाळीच्या शुभेच्छा!!!
*********************************
(संपादकमंडळातर्फे विसुनाना ह्यांनी ही मुलाखत घेतली.)