तुझी गाणी

उदात्त अंधाराच्या पोटी

तुझी गाणी.

भिरभिरत्या आसवांचा अर्क

तुझी गाणी.

माझ्या देशांतराच्या गोष्टी

गोष्टीतही तुझी गाणी

लखलखत्या सुरीच्या पात्याचे आर्जव

संगतीला तुझी गाणी.

माझ्या अनंत प्रसववेळा

सोबतीला तुझी गाणी

नादमाधुर्याचे षंढ अवसान

तरीही तुझीच गाणी.

आमचे प्राणोत्क्रमणाचे आख्यान

भोवताली तुझी गाणी

रस्त्याच्या कडेला भिजल्या प्राण्याचे पुराण

तरी आठवती तुझीच गाणी.

अवरुद्ध कंठ, भेलकांडली दृष्टी

तरी शोधितो तुझी गाणी

चरकातल्या उसाचे नशीब

अन् शृंगारतो तुझी गाणी.

गाण्यांचा प्रवास,

कर्मांची अनिश्चित ओसरी

तुझ्या डोळ्यात जन्मणारी पाख़रं

अन् माझी डोंबाची चाकरी.