एक सत्यघट्ना - भाग २

इतक्या पावसात ती फ़ांदी बाजुला करून बस जयसिंगपूरात पोचायला ९.१५ झाले. आता यापुढे अजुन १ ते २ तास पावसातून चालायचं होतं.

हातात फ़क्त एक छत्री,पिशवी आणि एक टॉर्च ..... तसाच नानांचा पुढचा प्रवास सुरु झाला !!

मघाशी बसमधल्या दांडीला आपटुन नाकाला चांगलाच मार बसला होता पण आता त्याचं दुखणं जरा जास्त जाणवु लागलं होतं.पावसाची रिपरिप चालुच होती.त्यामुळे कपडे ही भिजले होते.मधुनच वाऱ्याची झुळुक अंगावर शहारे आणत होती.रस्ता पायाखालचा असल्यामुळे नाना झपाझप पावले टाकु लागले...

"दिंगबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा .." मुखी दत्तनामाचा गजर चालु होता. मध्येच पावसाचा जोर थोडा कमी होत होता आणि तेव्हा रातकिड्यांची कीरकीर वातावरणातल्या भयाण शांततेत भर घालत होती. नानांना सुद्धा  क्षणभर भीती वाटे पण  मनात फ़क्त वाडी गाठायची हा एकच ध्यास होता आणि दत्तगुरु आपल्याला सुखरुप पोचवणार याची खात्रीही होती.

बराच वेळ चालल्यावर मात्र नानांचे पाय थकले.घड्याळात पाहिलं तर ११.१५ झाले होते आणि वाडीच्या जवळपास आल्याची चिन्हे पण दिसेना!

 आपण रस्ता चुकलो की काय अशी शंका आली आणि जरा इकडे तिकडे पाहिलं तर रस्ता तर नेहमीचाच होता.आणखी थोडे  १५-२० मिनीटे चालले  पण तरीही काही वाडीला पोहोचण्याची चिन्हे दिसेना ... काय चालु आहे काहीच उमगत नव्हते. बरं त्या पायवाटेवर रस्ता विचारायला तरी एवढ्या रात्री कोण असणार ? पाऊस आता थांबला होता पण वातावरणातली ती भयाण शांतता  होतीच ....शेवटी नानांनी  घटकाभर विश्रांतीसाठी  एका झाडाचा आडोसा पाहिला.

थोड्या अंतरावर एक पायवाट त्या मुख्य पायवाटेला मिळत होती. तिथे नानांना किंचीत प्रकाश दिसला.काहितरी मदत मिळते का ते पहायला नाना उठले आणि प्रकाशाच्या दिशेने चालु लागलें. नाना जसे जवळ जात होते तसा तसा तो प्रकाश दुर दुर जात होता... अगदी वाळवंटातल्या मृगजळासारखा !! पण कुणीतरी संमोहित केल्याप्रमाणे नाना त्याच्या मागे चालत गेले. आपण कुठे आणि का चाललो आहोत याचा विचारही न करता ते चालत होते...

अचानक एका खडकाला त्यांचा पाय अडकला आणि ते भानावर आले.त्या अंधुक प्रकाशात त्यांना एक धनगर मशाल हातात घेऊन उभा दिसला. अगदी साधा माणुस... एका हातात काठी,दुसऱ्या हातात मशाल, अंगावर घोंगडी .... अगदी सर्वसामान्य धनगर..त्या मशालीचा  प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडुन त्याच्या चेह्ऱ्यावर वेगळीच प्रभा जाणवत होती.त्याच्या पायाशी त्याचे एक छोटेसे कुत्रेही होते.

त्याच्या जवळ जायला ,त्याच्याशी बोलायला नाना पुढे झाले आणि पुन्हा त्याच दगडाला अडखळले. पहातात तर काय समोरचा धनगर गायब आणि काय आश्चर्य !! ते वाडीच्या वेशीवर पोचले होते.

दत्तगुरुंनी त्यांना सुखरुप वेशीपर्यंत पोहोचविले होते. मघाशी ज्या चकव्यात ते अडकले होते त्यातुन त्यांना दत्तगुरुंनी प्रकाशाच्या रुपाने बाहेर काढले होते.

त्या दिवसापासुन नानांचा विश्वास आणखीच दृढ झाला.ती अखंड पौर्णिमेची रात्र त्यांनी दत्तभजनात घालवली ..आणि दुसऱ्या दिवशी अतिशय समाधानाने कोल्हापुरला परतले.

श्री गुरुदेव दत्त !!