(ही कविता उन्हाळ्यात लिहिली होती. आता पावसाळा आला आहे. त्यामुळे कवितेतील जाणीव थोडी शिळी वाटू शकेल. निसर्ग कधीही आळशी नसतो आणि माणूस, विशेषतः कवीमाणूस आळशी असतो, याचा एक पुरावा....)
जहाल वज्र कोसळे सृष्टीवर
अथांग अभ्र दुष्कर ते नजरेवर
पाऊल पडता तप्त धरणीवर
आठवतो जलधारांचा प्रियकर.
जीव निश्चिंत मायेच्या देही
वसंत स्वच्छंद आकाश गाणी
पुरतो कुठला अनावर झोका
परी त्रस्त करती किरणांच्या रेखा.
घर्मबिंदू जयांच्या सुडौल देही
मंदावते चाल त्या क्लांत रागिणी
गगनी अखंडित उन्मत्त रवि
दृष्टी त्याची कंपित न भासे कधी.
कामना अंगी अन् विखुरल्या मौक्तिकमाला
जडावल्या नयनांनी शोधिती कृष्ण - रस प्याला
वाराही न सांगे त्याची चाहूल
निश्चल तोही तृषार्त भूवर.
प्रवाह सरितेचा न थांबला तरीही
आकंठ उतरला तो सूर्य तिच्याही देही
अजोड त्याचे दाहक बल
जर्जर होई जलही शीतल.
आरक्त ललना त्या हताश हतबल
वस्त्र कटिचेही वाटे अडसर
तुझी कृपाळा करती विनवणी
दिवस तो वणवा अन रात्र वैरिणी.
केशसंभार तो शुष्क विरागी
फुले माळली परी कोमेजली सारी
यौवनाची सहजता, आतुर ती मुद्रा
परी तुटता तुटेना ही उन्हाची मेखला.
दूर राहू नकोस ऐसा जलधारांच्या प्रियकरा
तुझ्या प्रेयसींच्या करे विलसती इथल्या राधिका
सख्या एकमेका भेटण्या नको विलंब
फुलवण्या एकेक अंग, आतुर तो एकेक थेंब.
मुक्त करी प्रिया तुझ्या अमृत करपाशे
उधळू दे त्यांना सौख्य जे त्यांच्या देहे अखंड साचे
तू भाग्यवंत, सहज सतत तुझा त्यांचा प्रेमसोहळा
तहानल्या पृथ्वीला फ़क्त एकदाच पर्जन्यकळा.