खूप खूप वर्षांपूर्वी वाळू बरीच ओली होती
रेघोट्यांची बालिश चित्रं चितारली जात होती
कधी मधी लाट येऊन पुसूनही जात होती
तरीसुद्धा उमेदीनंपुन: पुन्हा रेखीत होती
केव्हातरी लाट आली ---अर्धी कच्ची चित्रं पुसली
वाळू ओली असूनसुद्धा हातामधनं अशी निसटली!
खूप खूप वर्षं गेली-- लाट वाळू तुडवत गेली
कच्च्या पक्क्या आकारांचे खड्डे मात्र बुजवत गेली---
केव्हातरी प्रश्न पडला ते दिवस येतील काय?
काळामागे लोटलेली सारी चित्रं दिसतील काय?
बघता बघता लाट आली धूसरलेली रेघ दिसली
वाळू थोडी सरता सरता आकारांची ओळख जुळली
आता मला कळलं आहे अगदी खरं कळलं आहे
रेघोट्यांची बालिश चित्रं होती तशीच---तशीच आहेत
खूप खूप वर्षांनंतर अजूनही सजग आहेत!