एका आत्म्याचे मनोगत - १

तसा मी देवाघरी बराच काळ पडून होतो. तिथे जाण्यापूर्वी मी एका सधन घरांत सुखासमाधानाने रहात होतो. लहानपणापासून घरीदारी नोकरचाकर, वडिलांचा मोठा व्यवसाय व गडगंज पैसा! अगदी जन्मल्यापासून सुखात लोळत होतो. लाडाकोडांत बालपण गेले, मस्तीमधे तारुण्य उपभोगलं. तब्येत अगदी ठणठणीत राहिली. म्हातारपण तर आलंच नाही. एकदा गोडाचं भरपूर जेवून जो झोपलो तो उठलोच नाही. म्हणजे जागा झालो तो देवाघरीच!
            मला देवापुढे नेण्यात आले. देवाशी संवाद हा शब्देविणच होता. मी कांही बोलण्यापूर्वीच देव बोलू लागला. तू तिथे काय केलंस हे सगळं माहितीच आहे, तेंव्हा त्याविषयी कांही स्पष्टीकरणाची गरज नाही. तुझे भोग तर फिटले नाहीयेत. तेंव्हा परत तिथे जावेच लागेल. तुला सुधारण्याची इच्छा असेल तर एक संधी देतो. तुला कशा प्रकारचा नवीन अनुभव हवा आहे ते विचार करुन सांग. नुसती कल्पना पुरे, बाकीचा तपशील आम्ही भरु. घाई नाही. कितीही काळ इथे पडून राहिलास तरी माझी ना नाही.
          मी बराच विचार केला. देवाला म्हणालो, " मागचे आयुष्य फार सुखांत जगलो. दु:ख म्हणजे काय ते पहायलाच मिळाले नाही. तेंव्हा तो अनुभव घेऊन पहावा म्हणतो. तसेच मागच्या जन्मी मला प्रसिद्धी काही मिळाली नाही. आता ती पण मिळावी अशी इच्छा आहे. बाकी तू करशील ते, मला सत्तेची हांव नाही." देव म्हणाला, " थोडे थांबावे लागेल, योग्य वेळी पाठवतो."
मी म्हणालो," देवा, एक शंका आहे, परत जाईपर्यंत इथे काय? म्हणजे मला स्वर्गांत ठेवणार की नरकांत ?" माझ्या या मूढ प्रश्नावर कोणीतरी हंसल्याचा भास झाला. देव म्हणाला, " असं काही नसतं. या तुमच्या मनाच्या कल्पना आहेत. मला खुश करायला सगळे धडपडता, मी निर्गुण निराकार आहे. तुम्ही तिथे काय करता त्याचे कुठलेच चांगलेवाईट फळ इथे मिळत नाही. परत जावं लागणं हीच शिक्षा! आणि आणखी एक. हे सर्व ऐकलंस ते इथेच रहाणार. तिथे गेल्यावर इथलं कांहीच आठवणार नाही."
तथास्तु म्हणून एके दिवशी मला खाली पाठवण्यात आले.

                                                                                                                                                           क्रमशः