संदीप म्हणतो आयुष्यावर बोलू काही...
पण कशाला... तीथे आहे तरी काय...
एकच खोली... ती सुद्धा अंधारी... तीथे वावर फक्त नीशाचरांचा अन् लांडग्यांचा...
तडे गेलेल्या भिंती आहेत विश्वासाच्या... लक्तरं आहेत प्रेमाची...
आणि सगळ्यावर धूळ आहे ती बधीरतेची...
आणि संदीप म्हणतो आयुष्यावर बोलू काही... हं...
तीथे ना आशेची किरणे पडतात ना शीतल चंद्रप्रकाश...
नाही म्हणायला कधीतरी मिणमीणता दिवा शीलगतो...
पण त्याचा उजेड पडण्याऐवजी अंधारच फार...
मग कोणीतरी तो मालवतो... बहुतेक हे काम त्या वर लटकणाऱ्या वाघुळाचंच असावं...
आणि संदीप म्हणतो आयुष्यावर बोलू काही... हं...
एकदा चुकून एक फूलपाखरू आलेलं...
अंधारात धडपडलं... जळमटात फडफडलं... बिचारं;
भेदरलं... घाबरलं अन् जे पळालं ते कधीच नाही परतलं...
जाताना त्यानं सगळ्यांना सांगितलं असणार... कारण नंतर कुणीच नाही आलं...
आली ती फक्त वाघळं अन् लांडगे...
आणि संदीप म्हणतो आयुष्यावर बोलू काही... हं...
आता मला त्यांची सवयशी झालीये...
मला ओरबडल्याशिवाय अन् माझे लचके तोडल्याशिवाय त्यांना करमत नाही...
अन् कदाचीत मलाही...
तेव्हा नकोच... कवडश्यांनी ही गुदमरायला होईल...
नकोच... आपण आयुष्यावर बोलायला...