रातराणी

रातराणी...

तिने रात्री फ़ुलून यावे...
पाकळी पाकळी उमलावी...
वाऱ्याच्या शीतल लहरींवर
उमटावे लोभस गीत
तिच्या मादक गंधाचे...
उच्छ्वासांचे व्हावे दवबिंदू
आणि चमकावे टिपूर चांदण्यात...
तिच्या तजेलदार रंगावर
चढावा चंदेरी वर्ख...
रात्रीच्या नीरव शांततेत
तिने असावे आत्ममग्न...
अनुभवावा परमानंद
फ़ुलून येण्याचा...तृप्तीचा.

पहाट होताच
सूर्याचे पहिले किरण
पिऊन टाकतील तिचा वर्ख
आणि मिटून घेईल ती स्वत:ला...
गंधगीत होईल मंद...
कुण्या रसिकाच्या पडेल ते कानी...
तो कौतुकाने म्हणेल,
"इथे रातराणी फ़ुलली होती!"