............................................................
चटका बसेल माझा...!
............................................................
येऊ नकोस इतका
माझ्या जवळ फुला तू
चटका बसेल माझा, सांभाळ रे तुला तू !
आगीसवे कशाला
तू खेळतोस वेड्या ?
माझ्या धगीमुळे का कोमेजतोस वेड्या ?
बाहेर-आत माझ्या
आहेत फक्त ज्वाळा
आहे न संपणारा, माझे जिणे उन्हाळा !
तू जोडतोस नाते
का सांग विस्तवाशी ?
संबंध जोड जा तू कुठल्यातरी दवाशी !
पाहीन, जा तुझे मी
फुलणे दुरून सारे
माझ्याकडेच माझे फुलतील हे निखारे !
जा, थाट जा, तुझा तू
संसार सौरभाचा
मातीत जन्मलो मी ! आहेस तू नभाचा !
* * *
आहे, तुझी मलाही
नक्कीच आस आहे...
माझ्या न मालकीचा पण हा सुवास आहे !!
- प्रदीप कुलकर्णी
............................................................
रचनाकाल ः २२ जानेवारी १९९९
............................................................