कर्ण म्हणे

माझ्या अनुदिनीवर फार पूर्वी ही कविता लिहिली होती. पलिकडे कर्णावर चर्चा चालू आहे म्हणून इकडे प्रकाशित करतोय. :-)

हे कडाडणाऱ्या विजांनो
घोंघावणाऱ्या वाऱ्यांनो
ऐका मी बोलतोय मी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

हिमालयासारखा माझा आत्मविश्वास आहे
निर्भय आहे मी अजिंक्य आहे
बांधले ना कस्पटांनी वाघाला कधी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

उडवीन दाणादाण रणी
मर्दून टाकीन अहंकार
नाही टिकले समोर कुणी एका क्षणावरी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

ना दानात हरलो कधी
ना शौर्यात पडलो कमी
जिंकल्या चारी दिशा एकल्याच्या हिंमतीवरी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

असलो सुर्याचा अंश, टाकले मातेने तरी
वाढलो सूताच्या घरी, पडली न माया कमी
निंदा सहली परी मती न फ़िरली कधी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

http://anabhishikt.blogspot.com/2006/08/blog-post_06.html