बुरूज ढासळताना

ही नवीन पडली भेग ही पुन्हा निघाली राळ

इतिहासाची अन माझी जणु तुटते आहे नाळ

झेलल्या अगणित तोफा बुलंद असता छाती

राहिला काळ तो मागे आता उरली केवळ माती

हा चिराही हलला थोडा पलिकडे सरकली वीट

अभेद्य तोही फुटला !  ही नियती लावे दीठ

झुंजार पाहिल्या सेना पाहिलेत गनिमी कावे

त्या स्वार्थपरायण जनींचे साहिलेत हेवे दावे

कोसळेन जधी भूवरती जरी नामशेष होईन

स्पर्शियले शिवरायाने, मी अंती हेचि गाईन

- पराग जोगळेकर