केव्हा तरी ...

केव्हा तरी असा, साज तुझा थांबलेला
तुटल्या तारा तरी, सूर तुझा रेंगाळलेला ।

शब्द थांबले ओठी, जल राहीले नेत्री
स्वर तुझा मायेचा, काळजात दाटलेला ।

सोळा शृंगार माझे, दर्पणी या राहीले
वेणीतील मरवा, तुझ्या श्वासानेच गंधाळलेला ।

मैफिल संपता जासी, निः संग होउनी तु
सैरभैर तुझ्यासाठी, जीव माझा व्याकूळलेला ।

काटा रुते तुझ्या पायी, कळ माझ्या काळजात
उंबऱ्यात या माझा, पाय कसा थांबलेला ।