तुझं गणित पक्कं होतं
हिशेब आधीच झाला होता
माझ्या वेड्या मनात मात्र
स्वप्नांचाच झुला होता !
मनसोक्त उधळायला
आसुसलेलं मन होतं
किती द्यायचं; किती घ्यायचं
तुझं मनोमन होतं !
सुबक कोरीव रांगोळीत
मी भरले कितीक रंग
तुला वास्तवाचं भान
मी मात्र भ्रमात दंग !
तुझा स्पर्श; तुझा श्वास
रोमारोमात भिनलेला
उफाळणाऱ्या भरतीनं
अवघा देह झिंगलेला !
... क्षणामागून क्षण गेले
धुकं सरलं; सत्य उरलं
सगळं देऊन-घेऊनही
रितेपण का मनात उरलं ?
एकरूपतेत कसा अवचित
परकेपणा दाटून आला
वास्तवाचा दाहक स्पर्श
तेवढाच खरा; तप्त-ओला !
तटतट तुटले सारे बंध
धागे पुन्हा जुळलेच नाही
मध्ये उभी राहिली भिंत
कधी; केव्हा... कळलेच नाही !