ही तुझी सुगंधित धुंद व्यथा...!

..................................................
ही तुझी सुगंधित धुंद व्यथा...!
..................................................

मी तुझ्याचसाठी तळमळते !
...पण सांग कुठे हे तुज कळते ?

कशास अपुली ओळख झाली ?
मने जवळ का अपुली आली ?
काळीज असे हे खळबळते !

भासते नवेही जुने जुने
तुजशिवाय सारे सुने सुने
सरतो दिन, पण रात न ढळते !

आहेस दूर तू, दूर किती
दुनियेत तुझ्या तू चूर किती
मज तुझी आठवण का छळते ?

मला एवढा ध्यास तुझा का ?
जिकडे तिकडे भास तुझा का ?
चकव्यातच या मी घुटमळते !

जा बघून माझी तगमग तू...
माझ्यात तुझेही बघ जग तू...
- जे तडफडते, जे कळवळते !

ही सुरू न झाली, तीच कथा...
ही तुझी सुगंधित धुंद व्यथा...
- जी सतत अंतरी दरवळते !

- प्रदीप कुलकर्णी

..................................................
रचनाकाल ः 3 नोव्हेंबर १९९७
..................................................