प्रतिबिंब

झगमगणारा निळा आणखी सभोवताली पाचू
रंगांची ही उधळण अवघी किती अन कशी वेचू - !


    दगडांवरती उड्या मारुनी धावे अल्लड झरा
    रुप्यापरी तो चमचमणारा मोहून घेई नजरा

पीत-केशरी-निळी-जांभळी फुलून आली फुले
नानारंगी फूलपाखरी नाच त्यांवरी झुले


    चुकार एका मेघापाशी उडती सुंदर पक्षी
    का सोन्याची भरून घेती नयनांमाजी नक्षी

या साऱ्यांना ऊर्जा देई झळाळते रविबिंब
की भूवरती त्याचे उमटे रंगीत हे प्रतिबिंब ?

[रचना काल एप्रिल २००७]