दुर्दशा

                                   दुर्दशा

पवित्र देशा, कणखर देशा,सोन्याच्या देशा,

कशी जाहली सांग तुझी ही आज अशी दुर्दशा?

कैसे जडले तुजला देशा तीन भयंकर रोग?

पोप्युलेशन,पोल्युशन, वर करपशनाचे भोग.

राज्यकर्ते तर ह्या देशीचे बहू असती नाठाळ,

सत्तेसाठी पाहून घ्यावे त्यांचे खेळ खट्याळ.

गुंडगिरीचा प्रभाव इथे तर कायद्याचाही अभाव,

महागाईच्या विळख्यात आमुचा कसा लागावा निभाव?

विद्येच्या ह्या पाक मंदिरी काळाबाजार,

सरस्वतीच्या पुढे लक्ष्मी होई शिरजोर.

खेळाच्या मैदानी चाले सट्टाबाजार,

रणांगणीही लाजिरवाणा इथे भ्रष्टाचार.

दूष्काळ, भूकंप पूर दारिद्र हेची आंम्हाला शाप,

नोकरीतही तरूण पिढीला वशिल्याचा तो ताप.

नैतिकता अन सदाचाराने अशी बदलली कूस

कि माणूसकी नी आदर्शाचा कुठेच ना मागमूस.

एक मागणे तुजसी ईशा,बदलव ह्या देशा,

अशी उजाडो रम्य उषा अन उजळो दाही दिशा.

अलकाताई.