मी मराठी, रांगड्या महाराष्ट्राचा मज वारसा
शिवभूमीच्या यज्ञकुंडी अग्नी मी अनिवारसा
"जय भवानी, जय शिवाजी" मंत्र मी उच्चारता
साजणी होते यशश्रीही मराठी माणसां
मी समर्थचरणी सेवक, मी शिवाचा मावळा
गोंधळी अंबाईचा नि वारकरी मी बावळा
चाकरी करतो परी मज दीनही समजू नका
उदार मीही पुत्र, माझा बाप सह्याद्री जसा
आपुले म्हणतो तयां मी, जो का दुबळा बापुडा
"नाठाळाचे माथी काठी" हा कसा विसरू धडा ?
देव माझा कानडा, मुखी "राम राम पावनं "
मराठीबाणा हा अजाणां आकळेना फारसा
अस्मितेचे बीज हे शिवराज गेले पेरूनी
टिळक सावरकर बीजांकूर, तेचि माझे अग्रणी
क्रांतीची मी ज्योत, जपतो संस्कृतीला अंतरी
हुश्शार व्हा, डिवचू नका मम अस्मितेच्या चौरसा
जाणतो एकत्मता मी, जाणतो बलिदानही
प्रसंगी देशावर मराठी जाहला कुर्बानही
जाणतो मी नीती रीती, आणखी शिकवू नका
अनंतरूपी मी, मला कुणी काय दावील आरसा ?